शिरूर : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वडिलांचे छत्र हरपल्यांनतर ही शिरूर शहरातील अंजली ने जिद्दीने अभ्यास करत घवघवीत यश संपादन करत दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवले आहेत.
अंजली नवनाथ भुजबळ(रा.बाबुराव नगर,शिरूर) असे विद्यार्थिनीचे नाव असून ती सध्या विजयमाला विद्यालयात शिकत आहेत. अंजली हीचे वडील नवनाथ भुजबळ यांचे कोरोना हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक निधन झाले होते.
दहावीत शिकत असतानाच अचानक अंजलीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र यावर परिस्थितीने सावरून नेत अंजलीने जिद्दीने अभ्यास करण्याचा निर्धार केला. जिद्द व चिकाटी च्या जोरावर तिने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत तब्बल ९७.६० टक्के गुण मिळवत विजयमाला विद्यालयात प्रथम क्रमांकही पटकाविला आहे.
याबाबत बोलताना अंजली भुजबळ हिने सांगितले की, घरातील दुःख विसरून ही अभ्यासात सातत्य ठेवले. रात्री नऊ ते बारा व पहाटे चार ते सहा अशा वेळेत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. आई वर्षा यांनी मार्गदर्शन व पाठबळ दिल्यानेच यश मिळवले असल्याचे तिने सांगितले. या यशाबद्दल शिरूर शहर व परिसरात तिचे मोठे कौतुक केले जात आहे.