राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस आणि शिवसेना तसेच इतर मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील शिवसेनेचे काही आमदार हे फुटीरतेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार होणार असल्याचे राजकीय संकेत खुद्द महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येत आहे. परिणामी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असून ह्या बदलत्या राजकीय वातावरणामुळे महाविकास आघाडीत नैराश्यजन्य वातावरण असून भाजप व मित्रपक्ष सत्तेत येण्याचा दावा करीत असल्याने भाजपमध्ये मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यातील या बदलत्या राजकारणाचे पडसाद दौंड, बारामती, इंदापूर व पुरंदर या तालुक्यात उमटू लागले आहेत. दौंड मध्ये भारतीय जनता पक्षाचे राहुल कुल हे आमदार आहेत तर बारामतीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि इंदापूरमध्ये जलसंपदामंत्री दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत तर पुरंदर मध्ये संजय जगताप हे काँग्रेसचे आमदार आहेत. दौंडमध्ये भाजप आमदार राहुल कुल यांच्या गटात सध्या उत्साहाचे वातावरण असून कुल हे राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांपासून सक्रिय झाले आहेत. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आल्यास आमदार कुल यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे आमदार कुल यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे तर भाजपची सत्ता आल्यास दौंड, पुरंदर व इंदापूर या तालुक्यातील विकास कामांना काही प्रमाणात ब्रेक-अप बसण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांना मध्ये आहे.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात असून माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वक्षा शरद पवार यांनी विरोधी बाकावर बसण्याची तयारी असल्याचे संकेत दिले आहेत तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे दौंड तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. भाजपची सत्ता आल्यास आमदार कुल यांच्या कडून एककलमी व हुकूमशाही पद्धतीचा कारभार राबविण्यात येईल आणि शासकीय यंत्रणा विशेषता पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल होण्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्ये व्यक्त करीत आहेत.
मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर या बाबत चर्चेला उधाण आले असून उलट सुलट प्रतिक्रिया भाजप व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, जनतेने निवडून दिले लोकप्रतिनिधी हे लोकशाही पद्धतीला काळीमा फासण्याचे कृत्य करीत असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केल्या जात आहे. जनतेने त्यांना राज्यातील शेतकऱ्यांचा व सर्वसामान्यांचा विकास करण्यासाठी निवडून दिले आहे. मात्र राज्यातील आमदार हे जनतेचा विश्वासघात करत असून स्वतःच्या राजकीय व आर्थिक फायद्यासाठी जनतेला व शासकीय यंत्रणेला वेठीस धरत आहेत. अशा तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेकडून व कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहे.