इंदापूर : महान्यूज लाईव्ह
बिश्केक येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेमध्ये महिला कुस्ती गटात भारताच्या अहिल्या शत्रुघ्न शिंदे हिने 17 वर्षाखालील 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. अहिल्या ही इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथील असल्याने इंदापूर तालुक्यात या सुवर्ण पदकाचे कौतुक केले जात आहे.
अहिल्या हिने आज अंतिम लढतीत जपानच्या नात्सून मसुदा या महिला कुस्तीगीराचा तब्बल 10 : 0 अशा फरकाने पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. अहिल्या हिने हरियाणातील हिस्सार येथील गुरु हवासिंग आखाड्यात प्रशिक्षण घेतले आहे. आज कुस्ती स्पर्धा सुरू झाल्यानंतर तिने पहिल्या फेरीत संस्थांच्या कुमुशाय झुदान बॅकोओवा हिला 10 : 0 तर तिसऱ्या फेरीत कोरियाच्या जीन जू कांग हिला पण दहा शून्य फरकाने हरवले.
दरम्यान या संदर्भातील माहिती इंदापूर तालुक्यात मिळाल्यानंतर अहिल्याच्या कुटुंबाचे सर्वांनी कौतुक केले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर तालुका शिक्षण मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापुरातील कुस्ती केंद्राचे कुस्ती प्रशिक्षक मारुती मारकड आदींनी अहिल्या हिचे अभिनंदन केले.