दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील कु. सलोनी सतीश जाधव ह्या मुलीच्या संपूर्ण शालेय शिक्षणाची जबाबदारी जेजुरी येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सदस्य महादेव माळवदकर (पाटील) आणि प्रियदर्शनी महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा स्वाती माळवदकर यांनी घेतली आहे.
पाटस येथील कै. सतीश जाधव यांचे तीन वर्षापुर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. वडीलांच्या निधनानंतर जाधव कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. दौंड शहर व दौंड तालुका नाभिक संघटनेने आधार देत त्यांना मदत केली.
दौंड तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष गणेश साळुंखे यांनी मदतीसाठी आवाहन केल्यानंतर खोर येथील शशांक फाऊंडेशनने दोन मुली व जेजुरी येथील माळवदकर (पाटील) यांनी एक मुलगी दत्तक घेतल्या असून मागील तीन वर्षांपासून शैक्षणिक जबाबदारी पार पाडली आहे.
आता जेजुरी येथील माळवदकर कुटुंबांनी नुकतीच जाधव कुटुंबाची भेट घेऊन कुमारी सलोनी जाधव हिला शैक्षणिक मदत केली आहे. यावेळी जेजुरी येथील उद्योजक विजयकुमार मुंडलीक, दौंड तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष गणेश साळुंके, पाटस शाखाध्यक्ष नवनाथ सोनवणे, रवींद्र गायकवाड, निलेश गायकवाड आदी उपस्थित होते.