किशोर भोईटे : महान्यूज लाईव्ह
प्रचंड विरोधानंतरही लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेवर ठाम राहिलेल्या सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याप्रती आता निंबोडीकर कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. येत्या गुरुवारी (23 जून रोजी) निंबोडी येथे हा कार्यक्रम होणार असून, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. यानिमित्ताने निंबोडी गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या सहा कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे.
गुरुवारी सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती गावच्या वतीने देण्यात आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, प्रताप पाटील, माजी सभापती प्रवीण माने, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, छत्रपती चे संचालक रणजीत निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनाही या निमित्ताने आमंत्रित करण्यात आले आहे.
दत्तात्रय भरणे यांनी मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत बरीच वर्षे रखडलेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या निधीची तरतूद केली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाकडी निंबोडी सह आसपासच्या गावांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.