दिल्ली : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची घोषणा झाली असून भाजपप्रणीत एनडीए च्या वतीने द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपती पदासाठी च्या उमेदवार असतील अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिली. दुसरीकडे एनडीए विरोधक यूपीएकडून विरोधकांनी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी जाहीर केले आहे.
21 जून रोजी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. यामध्ये देशाच्या पूर्वेकडील भागातील महिला उमेदवार आणि आदिवासी समाज अशा विविधांगाने द्रौपदी मुर्मु यांच्या नावावर एकमत झाले. द्रौपदी मुर्मु या मयुरभंज जिल्ह्यातील बडिप अशी गावातील रहिवासी असून त्या संथाल या आदिवासी जमातीतील आहेत.
सन 2000 आणि 2009 या कालावधीत या आमदार होत्या. शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात केल्यानंतर राजकारणात उतरल्या. त्यांनी बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये वाणिज्य आणि वाहतूक मंत्री पदाची धुरा सांभाळली होती. त्या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल झाल्या.
दुसरीकडे विरोधकांनी जाहीर केलेले यशवंत सिन्हा हे उमेदवार तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपमधून केली होती. ते देशाचे अर्थमंत्री देखील होते. भाजपतील शिर्षस्थ नेतृत्वाशी वाद झाल्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत.