महान्यूज इंटरनॅशनल रिपोर्ट
जग एकविसाव्या शतकातून बाविसाव्या शतकाकडे जात असताना प्रचंड प्रगतीची शिखरे आपण गाठतो आहोत; पण माणसांच्या चेहऱ्याची माणसे मात्र बिघडताना दिसत आहेत. इथिओपिया या देशातील पश्चिमेकडील ओरोमिया प्रांतात मागील वर्षापासून दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हजारो जणांचा नरसंहार झाला असून, 18 जून रोजी झालेल्या हल्ल्यात तब्बल 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
इथिओपियातील हा हल्ला लिबरेशन आर्मीच्या कडून झालेला असण्याची शक्यता वर्तवली जात असून, इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी तशी शंका व्यक्त केली आहे. नोव्हेंबर दोन हजार वीस पासून इथिओपियात हे दहशतवादी हल्ले सुरू असून देशाच्या उत्तरेकडील भागात ओरोमो वंशाच्या लोकांसाठी कार्यरत असणाऱ्या लिबरेशन आर्मी या संघटनेने हा हल्ला केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान अबी अहमद यांनी निर्दोष नागरिकांवरील हल्ले अतिशय घातक असून, हा हल्ला म्हणजे भयानक कृत्य असल्याचे म्हटले आहे. उत्तरेकडील भागातील अल्पसंख्यांक असलेल्या आम्हार या वंशाच्या लोकांची यामध्ये सर्वाधिक हत्या झाले असल्याचे सांगितले जात आहे.