भवानीनगर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे आज जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल, छत्रपती कन्या शाळा व सीनियर कॉलेज यातील जवळपास एक हजाराहून अधिक मुलांनी यात सहभाग घेतला होता. अतिशय उत्साहात झालेला व अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमामध्ये 30 योगासने घेण्यात आली.
निमा बारामती डॉक्टर्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात योगासनाचे महत्व पटवून देताना असोसिएशन चे सेक्रेटरी डॉ महेश घोळवे यांनी प्रत्येक आसन मुलांना समजावून सांगितले व त्याचे आरोग्य विषयक फायदे सांगितले. पूर्वी लोक हे शारीरिक परिश्रमाने कणखर असायचे, मात्र आता आधुनिक विलासी जीवनशैली व फास्ट फूड ही मनुष्याला विविध आजारांकडे ओढून नेत आहे आणि त्यावर मात करण्यासाठी योग्य अभ्यासाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
योगासनांमध्ये श्री. देवकर, श्री. राऊत, श्रीमती गोडसे, यांनी तर योग प्रशिक्षक म्हणून अभय घोळवे, प्रीतम खरमाटे, ऋषी घोळवे, स्वप्निल जगताप यांनी मदत केली. छत्रपती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री मचाले, कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. यादव, इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका मधुमाला जगताप व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.