शिरूर : महान्यूज लाईव्ह
भक्ष्याच्या शोधात असताना तो विहिरीत पडला. रेस्क्यु पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र शर्थीचे प्रयत्न करूनही बिबट्याची झुंज अपयशी ठरली.
वडगाव रासाई (ता.शिरूर) येथे सकाळच्या सुमारास बाळासाहेब जाधव यांच्या विहिरीत बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले होते. यावेळी शेतकरी जाधव यांनी गावचे सरपंच सचिन शेलार यांना माहिती कळवली होती. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ,वनविभागाचे अधिकारी कर्मचारी, रेस्क्यू टीम हे घटनास्थळी दाखल झाले होते.
बिबट्या हा विहिरीत पाण्यावर लाकडाच्या ओंडक्याच्या आधारावर तग धरून बसलेला होता. रेस्क्यू टीम ने पाण्यातील बिबट्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अनेक तास बिबट्या पाण्यात असल्याने बिबट्याचा पाण्यात पडून मृत्यु झाला. त्यानंतर मृत बिबट्या ला पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. या वेळी सर्वांनी मोठी हळहळ व्यक्त केली.
विहिरीतील बिबट्याला रेस्कयु करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रवीण क्षीरसागर, वनरक्षक भुटेकर, वन कर्मचारी नवनाथ गांधले, सुधीर शितोळे, गोविंद शेलार, मनोज चौधरी, शरीफ शेख, अभिजीत सातपुते आदी कर्मचाऱ्यांनी रेसक्यू ऑपरेशन मध्ये सहभाग घेतला होता.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने सातत्याने अधूनमधून नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असते. अनेकदा शेळ्या मेंढ्या कुत्री यांच्यावर बिबट्याने हल्ले केले आहेत. यामुळे वनविभागाने अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.