बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीची प्रसन्न सकाळ आणि जोडीला आंतरराष्ट्रीय योग दिनाचा योगायोग.. अशावेळी बारामतीच्या मएसो विद्यालयाच्या प्रांगणात हजारो विद्यार्थी एकाच वेळी योगा अभ्यासासाठी सज्ज झाले आणि सुरू झाला ओमकार आणि भ्रामरी प्राणायामाचा स्वरनाद…. वेगवेगळ्या योग प्रात्यक्षिकांनी येथील वातावरण अगदी भारून टाकले आणि आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन अशा प्रसन्न वातावरणात बारामतीत साजरा झाला.
येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रिय योगदिन कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेद सय्यद सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सामूहिक योगसाधनेत विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सहभाग घेतला. योगाची नयनमनोहर प्रात्यक्षिके यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व युनोमध्ये २०१५ मध्ये मांडले आणि तेव्हापासून संपूर्ण जगभरात हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारताची संस्कृती जगात महान आहे. या संस्कृतीचे सर्व जगाने अनुकरण करावं. योग हा या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक असून योग दिनामुळे संपूर्ण जग आज एकत्र आले आहे. दररोज योगासने, ध्यानधारणा, प्राणायाम केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व ही उर्जा आपणास दिवसभर सकारात्मक ठेवते असे मत यावेळी मुख्याध्यापक सय्यद यांनी मांडले .
यावेळी येथुन पुढे दररोज योगसाधना करून ‘निरोगी भारत, आरोग्यसंपन्न भारत निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला .याप्रसंगी पूर्वप्राथमिक ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते . विद्यालयाचे योगशिक्षक दादासाहेब शिंदे यांनी योगांची प्रात्यक्षिके करून दाखवली. वीरभद्रासन, ताडासन, वज्रासन, बद्ध कोणासन, क्लॅपिग, कपालभाती, शुद्धीकरण क्रिया, भ्रामरी, प्राणायाम, ओमकार यांची सामुहिक प्रात्यक्षिके घेतली.
यावेळी संस्थेच्या वतीने योगदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास उपमुख्याधापक धनंजय मेळकुंदे, पर्यवेक्षक राजाराम गावडे, शेखर जाधव, चंदु गवळे व पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक – शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल गावडे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार जाधव यांनी तर आभार बाळासाहेब अभंग यांनी मानले .