शिरूर : महान्यूज लाईव्ह
वडगाव रासाई (ता.शिरूर) येथे विहिरीत जिवंत बिबट्या आढळून आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, वडगाव रासाई (ता.शिरूर) येथील शेतकरी बाळासाहेब जाधव हे नेहमीप्रमाणे शेतातील विद्युत पंप विहिरीवर चालू करण्यासाठी सकाळी आले होते. या वेळी त्यांना विहिरीत आवाज येत असल्याचे ऐकू लागले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले.
बिबट्या विहिरीत लाकडाच्या आधारावर तरंगत आहे. हे पाहताच त्यांनी गावचे सरपंच सचिन शेलार यांना याबाबत माहिती कळवली. घटनेची माहिती कळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच गावातील ग्रामस्थांनी विहिरीतील बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात उसाचे क्षेत्र वडगाव रासाई, मांडवगण फराटा आदी भागात जास्त असून या भागात बिबट्याने अनेकदा शेळ्या, मेंढ्या, कुत्री यांच्यावर हल्ले देखील केले आहेत. या भागात बिबट्यांची संख्या आणखी असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.