बारामती : महान्यूज लाईव्ह
आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रकचा ब्रेक फेल होऊन अपघात झाला आहे. हवेली तालुक्यातील उरुळी कांचनजवळ असलेल्या शिंदवणे घाटात ट्रकचा ब्रेक फेल झाला.. या अपघातात १२ वारकरी जखमी झाले, त्यातील चार जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान या घटनेनंतर उपमुख्यमंत्री कार्यालयाने तत्परता दाखवून या वारकऱ्यांच्या उपचाराची व्यवस्था केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनिलकुमार मुसळे यांनी यासंदर्भातील सूत्रे तातडीने हलवली.
गेली अनेक वर्ष संत ज्ञानेश्वर महाराज पालखी च्या सोहळ्याच्या पुढे एक मुक्काम अगोदर संबंधित गावात जाऊन ग्रामस्वच्छता करणारी आणि जनजागृती करणारी ही संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची दिंडी आहे. गेली पंधरा वर्षे या दिंडीचा हा नित्यनेम आहे पालखी तळावरील स्वच्छता आणि जनजागृती हा या दिंडीचा प्रमुख उद्देश आहे.
पालखी सोहळ्याचे प्रस्थान असल्याने त्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी मधून हे सर्व वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सहभागी होण्यासाठी आळंदीच्या दिशेने जात होते.
उरळीकांचनच्या अलीकडे असलेल्या शिंदवणे घाटात ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून ट्रक एका टेकडीवर घातला. ट्रक टेकडीला धडकल्याने ट्रकच्या टपावर बसलेले वारकरी खाली पडले आणि जखमी झाले. या अपघातात ट्रकच्या केबिन च्या वर बसलले १२ जण खाली पडून जखमी झाले. त्यातील आठ जण किरकोळ जखमी तर चार जण गंभीर जखमी झाले.
जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. याची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री कार्यालयाचे स्विय सहाय्यक सुनील कुमार मुसळे यांनी तातडीने जखमींना उपचार मिळण्याची व्यवस्था करण्यासाठी सूत्रे हलवली स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या व मदत कार्याच्या माध्यमातून या जखमींना उरळीकांचन येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या जखमींवर उरळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.