इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर हायवेवरील इंदापूर शहराजवळील सरडेवाडी टोलनाक्यावर आज ( दि. २० ) सरडेवाडी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी टोल नाका बंद आंदोलन करून काही काळासाठी टोलवसुली बंद पाडली. या आंदोलनामुळे हायवेवर वाहनांच्या रांगाच रांगा दिसून आल्या.
आठ दिवसापू्र्वी १३ जून रोजी सरडेवाडीचे सरपंच सीताराम जानकर यांच्या स्वाक्षरीने सरडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वाहन मालकांच्या मागण्यासंदर्भात टोल प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले होते. सरडेवाडी गावातील वाहनांना टोल फ्री करावा. गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी लोखंडी उड्डाणपूलाची तात्काळ निर्मिती करावी. टोल नाका परिसरात पुणे सोलापूर लेनलगत सेवा रस्ता तयार करावा. सेवा रस्ता संरक्षक भिंत उभारावी अशा मागण्या सरडेवाडी ग्रामस्थांच्या आहेत.
या मागण्यांवर टोलनाका प्रशासनाकडून काहीच कार्यवाही न झाल्याने आज टोकनाका बंद करण्यात आला. या आंदोलनात ग्रामस्थांसोबत शाळकरी मुलांची संख्याही मोठी होती. आंदोलनस्थळी आलेल्या इंदापूरचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश पवार यांनी टोकनाका प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात मध्यस्थी केली. टोल प्रशासनाकडून आठ दिवसात बैठक लावली जाईल, त्यामध्ये सर्व प्रश्नांवर मार्ग काढला जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.