मुंबई : महान्यूज लाईव्ह
सत्य हे कल्पनेपेक्षाही पुढचे असते असे म्हणतात, ते काही वेळेस खरे ठरते. वडिल स्वप्नात आले आणि त्यांनी ४ कोटीच्या खजिन्याची माहिती दिली, असे जर कुणाला सांगितले तर ते कुणाला खरे वाटेल का ? पण लालबागच्या एका व्यापाऱ्याच्या बाबतीत हे खरे ठरलेले आहे.
लालबागचे व्यापारी दीपक जैन यांच्याबाबतील ही घटना घडली. त्यांच्या स्वप्नात त्यांचे वडील आले आणि त्यांनी आपल्या गिरगावच्या घरात खजिना असल्याचे जैन यांना सांगितले. दीपक जैन यांच्या कुटुंबियांनी गिरगावच्या विठ्ठलवाडी परिसरात एक रुम भाड्याने घेतलेली होती. जैन यांच्या वडिलांच्या निधनानंतर ही रुम बंद होती.
वडिलांबाबतचे स्वप्न पडल्यावर जैन हे गिरगावच्या त्या घरी गेले. त्या घरात अनेक महिने कोणीही गेलेले नव्हते. त्यामुळे या घराची साफसफाई केल्याची माहिती घरमालकांनी दिली. यानंतर या घरातील खजिन्याची चोरी या सफाईकामगारांनी केली असावी असा संशय जैन यांना आला. त्यांनी तशी तक्रार लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये केली. जैन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा तपास सुरू केला. ज्या सफाई कामगारांनी सफाईचे काम केले, त्या सफाई कामगार प्रकाश आणि त्याचा मुलगा प्रवीण व यासिक या तिघांची पोलिसांनी चौकशी केली.
पोलिसांनी या सर्वांवर पाळत ठेवली. त्यावेळी त्यांच्या राहणीमानात बदल झाल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या चोरीचा उलगडा झाला. या तिघांकडून एक किलो सोन्याची बिस्किटे, ८०० ग्रॅम सोने, साधारण १ कोटी २५ लाखाचे हिरे हस्तगत झाले.
जैन यांच्या वडिलांनी स्वप्नात सांगितलेली हकिगत खरी ठरली. चार कोटीचा खजिना जैन यांना मिळाला. स्वप्नामुळे उलगडलेल्या या चार कोटीच्या चोरीची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.