सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या विविध सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका या त्या त्या गावातील प्रस्थापितांची धूळधाण उडवणाऱ्या ठरल्या. मात्र रविवारी झालेली इंदापूर तालुक्यातील सपकळवाडीची निवडणूक आणखीनच चर्चेतील ठरली, कारण जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात आदर्श गावाचा झेंडा रोवणाऱ्या या सपकळवाडीत खुद्द सत्ताधाऱ्यांचा पालापाचोळा भाजपने केला. अवघ्या दोनशे – अडीचशे जणांचे मतदान असलेल्या या निवडणुकीत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ यांच्या पॅनेलला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.
या निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी पॅनलचे नेतृत्व करत होते, या जय जोर्तिलिंग पॅनलचा विजय झाला. या पॅनेलने एकहाती सत्ता सोसायटीवर आणली.
नेतृत्व अजित सपकळ, बापुराव सपकळ, बी. के. सपकळ, उमेश सपकळ, संजय सपकळ, नानासाहेब सपकळ, राजेंद्र सपकळ व त्यांच्या इतरही सहकाऱ्यांनी केले. या संस्थेच्या निवडणूकीत अरुणादेवी सपकळ, रूक्मीणी चव्हाण, बी. के. सपकळ, तुकाराम सपकळ, पांडुरंग सपकळ, निलेश सपकळ, विठ्ठल भुजबळ, राजेंद्र सपकळ, ज्ञानदेव सपकळ, पोपट पवार हे ११ उमेदवार निवडून आले तर सचिन सपकळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे दिलीप नागू राऊत हे बिनविरोध तर बुबासो दत्तात्रेय सपकाळ हे मतदानातून असे अवघे दोन उमेदवार निवडून आले.
या निवडणुकीने राष्ट्रवादीला मोठा झटका दिला असून या विजयानंतर सपकळवाडीत पहिल्यांदा उन्हाळ्यात दिवाळी साजरी झाली. प्रचंड जोशात निघालेल्या मिरवणुका आणि जल्लोषी वातावरण याने सपकळवाडीचा कालचा माहोल सगळा बदलून गेला होता. ज्येष्ठ नागरिकांसह अगदी युवक-युवती देखील या मिरवणुकीत सहभागी झाले होते, हे कालच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. बऱ्याच कालखंडानंतर भाजपच्या गळ्यात विजयाची माळ पडल्याने हा आनंद द्विगुणित झाला होता.
गेली दहा वर्ष सपकळवाडी गावावर सचिन सपकळ यांची एकहाती सत्ता आहे. सचिन सपकळ यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना एकत्र करत या गावामध्ये सर्वंकष बदल करण्याचा प्रयत्न केला. विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गावाला जिल्ह्याच्या व राज्याच्या नकाशावर नेऊन ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली.
गेली काही वर्ष सचिन सपकाळ यांची ही सत्ता सपकळवाडीवर असून सपकळवाडीच्या सोसायटीत अत्यंत कमी मतदान होते. सपकाळ यांच्या समर्थकांच्या मते अगदी थोडक्या मताने पराभव झाला. मात्र असे असले, तरी हा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागणारा आहे. त्याचे कारण असे की, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा परिस्थितीत भाजपने मिळवलेला हा विजय राष्ट्रवादीला मोठा संदेश देणारा ठरला आहे.
विकासकामांच्या भाऊगर्दीत, राजकीय सत्तेच्या या सार्या गडबडीत प्रत्येक वेळी नागरिकांना धरून गृहीत धरून चालण्याचा त्यांचा निर्णय चुकला असावा असेच हे या निवडणुकीवरून दिसते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांना गावाने भरभरून मतदान केले आणि त्यानंतर या गावात राष्ट्रवादीची अनभिषिक्त सत्ता असल्याचा संदेश तालुक्यात पोहोचवला, मात्र सपकळवाडी च्या सोसायटीतील निवडणुकीचे गणित राष्ट्रवादीच्या विजयाचा वारू आणि त्याची दिशा बिघडवणारे ठरले आहे.
लोकांना गृहीत धरणे आणि विकास कामाच्या जोरावर आपण विजयी होऊ असे मानणे हेच एकमेव विजयाचे गणित ठरणार नाही असाच संदेश या निवडणुकीच्या निमित्ताने सपकळवाडीकरांनी दिला आहे. अर्थात तो राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आणि खुद्द राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील हा संदेश आहे अशी प्रतिक्रिया या विजयानंतर भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली.