सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यामध्ये सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन आपण समाजकारण, राजकारण केले. हा तालुका सर्व जाती धर्मांबरोबर घेऊन जाणाऱ्यांबरोबर राहिला आहे. समाजा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा व गैरसमज पसरून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न काही मंडळींनी चालवला आहे, अशांपासून समाजाने सावध राहण्याची गरज आहे अशी टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता केली आहे.
निमसाखर (ता. इंदापूर ) येथे बुधवार दि.१५ व गुरुवार दि.१६ रोजी हजरत ख्वाजा बंदे नवाज निमसाखर आठव्या उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या भागातील आयुब शेख यांच्या प्रयत्नातून या दर्ग्याचे काम झाले आहे. यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते हजरत ख्वाजा बंदे नवाज दर्ग्याला फुलांची चादर चढवून यावेळी फत्या देण्यात आला. यानिमित्ताने प्रसिद्ध कव्वालीकार हसिम नाझा यांचा कवालीचा कार्यक्रम झाला. दरम्यान पाटील बोलत होते.
पुढे बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजासह गेली चार पिढ्यांपासून आपण एकत्र आहोत. काही राजकीय निर्णय घेत असतानाही इंदापूर तालुक्यात कायमच जातीय सलोखा राखला आहे. महाराष्ट्रामध्ये ११२ सहकारी साखर कारखाने असून या साखर कारखान्यांमध्ये दोन ते तीन महिला संचालिका असतात. मात्र मुस्लिम समाजाला संधी देणारा एकमेव महाराष्ट्रातील निरा भीमा साखर कारखाना असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
यावेळी नीरा भीमा साखर कारखान्याचे संचालक रमेश गोरे, रणजित रणवरे, बाबुराव रणवरे, अनिल बोंद्रे, युवराज रणमोडे, लालासाहेब चव्हाण, दत्तात्रय चौधरी , गजानन सातपुते, दत्ता रणवरे यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.