राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह.
दौंड : जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज सोमवारी देहू येथून प्रस्थान होणार आहे. पाच दिवसात या पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्यात आगमन होणार आहे. मात्र संत तुकाराम महाराज पालखी मार्ग अर्थात पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरळीकांचन ते पाटस पर्यंत ठिकठिकाणी केरकचरा, प्लास्टिकचे कागदे व बाटल्या घाणीचे ढिग साचले असून सांडपाण्याची गटारे तुंबली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पाच दिवसांवर हा पालखी सोहळा येवून ठेपला असताना आरोग्य विभाग नेमके करतेय तरी काय? असा प्रश्न पडत आहे. पाटस टोल प्लाझा कंपनी आणि राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षांमुळे पालखी सोहळ्या सोबत येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
जगद्गुरू संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी काही दिवसांपुर्वी पालखी मार्गावरील गावांची व मुक्कामाच्या ठिकाणची पाहणी केली होती. त्यावेळी सर्व शासकीय विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व सोयीसुविधा तसेच कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही तसेच आरोग्यांचा प्रश्न उदभवणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना त्यावेळी केल्या होत्या.
संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याची प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज सोमवारी (दि.20) देहू येथून प्रस्थान होणार आहे. शनिवारी (दि.25) या पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्यात आगमन होणार आहे. या सोहळ्याला अवघ्या पाच दिवसांचा कालवधी राहिला आहे.
मात्र सध्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर लाखो भाविकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न ऎरणीवर आला आहे. या मार्गावर उरूळी कांचन ते पाटस पर्यंत गावागावांतील चौकाचौकात केरकचरा आणि घाणीचे ढिग साचले आहेत. महामार्गावरील हॅाटेल, ढाबे व इतर व्यावसायिकांकडून केरकचरा हा महामार्गावर टाकला जात असल्याने हे ठिकाठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत तर महामार्गावरील सांडपाण्यांची गटारे तुंबली आहेत.
परिणामी या घाणीमुळे दुर्गंधी पसरली आहे. महामार्गावरील सेवा रस्त्यावर पाटस परिसरात खड्डे पडले आहेत. तर काटेरीझुडपे ही वाढली आहेत. उड्डाण पुल व भुयारी मार्गावर पावसाचे पाणी साचले जात आहे.याबाबत योग्य नियोजन ही केले गेले नाही असे चित्र सध्या पालखी मार्गावर पहावयास मिळत आहे.
केरकचरा, घाणीचे ढिग याची योग्य विल्हेवाट कशी लावायची याचे नियोजन संबंधित विभागाने अद्यापही केले नाही.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे महामार्गावर ठिकठिकाणी साचलेल्या केरकचरा ढिगावरून स्पष्ट होत आहे. आरोग्य विभागाने स्वच्छता करण्यासाठी हालचाली केल्या नसून पाटस टोल प्लाझा कंपनी व राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे ही याकडे दुर्लक्ष होत आहे. दौंड तालुका दंडाधिकारी अर्थात तहसीलदार संजय पाटील आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंजिक्य येळे यांनी पाटस टोल कंपनी आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी तसेच या प्रकारांकडे लक्ष घालून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनापूर्वी महामार्गावरील गावांची स्वच्छता करण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात यावी अशी मागणी वारकरी सांप्रदाय व ग्रामस्थांनी केली आहे.