आळंदीत सुरक्षिततेस प्राधान्य ; पोलीस बंदोबस्त तैनात ; स्थानिक त्रस्त..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।। पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधीले।।संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळ्याचे प्रस्थान मंगळवारी ( दि, २१ ) सायंकाळी चार वाजता माऊलींच्या पालखी सोहळ्याचे विना मंडपातून आषाढी पायी वारीस जाण्यास पंढरीकडे पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल.
महाराष्ट्र राज्य परिसरातून भाविकांसह नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेस वारीत प्राधान्य देण्यात आले आहे. पालखी सोहळ्यातील शासकीय खात्यांच्या माध्यमातून सेवा सुविधांची कामे करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.
यावर्षीचा सोहळा दोन वर्षानंतर पायी वारी सोहळा होत असल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे. प्रस्थान सोहळ्यास लाखों भाविकांची हरिनाम गजरात उपस्थिती रहाणार आहे. भाविक, वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला असून सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमे-याची नजर आहे.
आळंदी नगरपरिषद प्रशासनाने प्रांत विक्रांत चव्हाण , तहसीलदार तथा प्रशासक आळंदी वैशाली वाघमारे, मंडलाधिकारी स्मिता जोशी, मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचे नियंत्रणात तयारी केली आहे. इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले असल्याचे जाधव यांनी सांगितले.
आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, व्यवस्थापक माउली वीर यांच्या नियंत्रणात सोहळ्याची तयारी पूर्ण केली असून देवस्थान प्रस्थान सोहळ्यास सज्ज झाले आहे.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची कोठी देखील भरली व सजली आहे. यासाठी उपव्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी गेल्या दोन महिन्या पासून कामकाज पाहिली आहे. यासाठी परिश्रम पूर्वक नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. दोन महिन्यांपासून पालखी सोहळ्याच्या नियोजनाची तयारी सुरु केली आहे. कोठीचे काम पूर्ण झाले आहे. सोहळ्या सोबत असलेले शासकीय अधिकारी, मानकरी, सेवेकरी, गावातील प्रतिष्ठित मंडळी, प्रशासकीय व्यवस्थापन यांची प्रसादाच्या जेवणाची व्यवस्था यात्रा नियोजनात आळंदी नगरपरिषदेने केली आहे.
आळंदी देवस्थानने देखील दररोज ५०० वर लोकांची जेवणाची व्यवस्था सोहळ्यात नियोजन केले आहे. यासाठी शिधा, सोहळ्यात लागणाऱ्या सर्व वस्तूंची तयारी झालेली आहे. तीन ट्रक, तीन रिक्षा, गाड्या सोहळ्यात सोबत आहेत. सोहळ्यात पहाटे पवमान अभिषेक व रात्री दुधारती होते. यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव पूर्ण झाली असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
गेली दोन वर्षे वारी न झाल्याने यावर्षी ३५ टक्के भाविक यात्रेत वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही ठिकाणी पाऊस झाल्याने पेरण्या झाल्या आहेत. यामुळे या भागातील वारकरी शेतकरी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त आळंदी शहरात तैनात करण्यात आला आहे. आळंदी मंदिर परिसर हा नो हॉकर्स झोन म्हणून पोलीस प्रशासनाने जाहीर केला आहे. सोहळ्यास सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच भाविकांना दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.
आळंदीत वाहनांना प्रवेश बंद
आळंदीत पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची वाहने वगळता मंगळवार ( दि. २२ ) पर्यंत इतर वाहनांना प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे. इतर वाहनचालकांनी पुणे- नाशिक रस्ता, देहूफाटा ते मोशी रस्ता, चऱ्होली धानोरे बायपास, मरकळ-कोयाळी रस्ता, पुणे-नगर आदी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.
स्थानिक नागरिक, वैद्यकीय अधिकारी,आळंदी नगरपरिषदेची वाहने देखील पोलीस प्रशासनाने अडविल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांची वाहने यात्रातील पोलीस बंदोबस्त नावाखाली वेढीस धरू नयेत अशी मागणी नागरिकांची आहे.
नगरपरिषद प्रशासनाने पुणे जिल्हा महसूल, आरोग्य, पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे यात्रा नियोजनात भाविक, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत वारीची तयारी केली असल्याचे आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले. आळंदीत सोमवारी ( दि.२० ) श्रींचे अश्वांचे आगमन होत असून राज्यातील भाविक हरिनाम गजरात दाखल होत आहे. आळंदीत हरिनामाचा गजरात कीर्तन,प्रवचन,अखंड हरिनाम सप्ताहात हरिजागर सुरु झाला आहे. मंगळवारी ( दि. २१) माउली मंदिरातून श्रींची पालखी सोहळ्यासह पंढरीला जाण्यास प्रस्थान ठेवणार आहे.