सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : विकृत बदनामीकारक लिखाण करणाऱ्या जेम्स लेन या लेखकाच्या विरुध्द इंदापूर तालुक्यातील शिवप्रेमींनी सन 2013 मध्ये आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिसांनी अनेक शिवभक्तांवर खटला दाखल केला होता. सकल मराठा समाजाच्या वतीने ॲड. सचिन चौधरी यांना कायदेशीर प्रक्रीयेची जबाबदारी देण्यात आली, त्याप्रमाणे अनेक कार्यकर्त्यांचे विनाशुल्क जामीन त्यांनी करून दिले व पुढे खटल्याचे कामकाज ही विनामूल्य पाहिले, त्यामुळे ॲड.सचिन चौधरी यांचा अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने स्वराज्य रक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
ॲड.चौधरी यांनी शिवभक्तांवर दाखल केलेला खटला महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे खटला मागे घेण्यात यावा, याकरिता संबंधित खात्याकडे पाठपुरावा देखील केला. सरते शेवटी प्रयत्नांना यश आले व महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे शिवप्रेमींच्या विरुद्धचा खटला महाराष्ट्र शासनाने रद्द केला व ती बाब ॲड. सचिन चौधरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी शंभुराजे युवा क्रांती प्रदेशाध्यक्ष सुनील बाप्पा मोरे, माजी नगराध्यक्ष कृष्णाजी ताटे, गटनेते कैलास कदम, अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रदेश उपाध्यक्ष पवन घोगरे, गोरख शिंदे, मारुती मारकड आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजयकुमार फलफले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण पवार यांनी केले. आभार सचिन जाधव यांनी मानले.