बारामती : महान्यूज लाईव्ह
दोन वर्षाच्या खंडानंतर यावर्षी विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी वारी निघते आहे. बारामतीमध्ये दरवर्षी संत तुकाराम महाराजांच्या या पालखीची सर्वजण मोठ्या उत्सुकतेने वाट पहात असतात. यावर्षी या वारीच्या बारामती तालुक्यातील उंडवडी ते बारामती या प्रवासात ‘ गणिती वारी ‘ काढण्याचे नियोजन बारामतीतील गणीतप्रेमींनी केले आहे. गणित हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचा आणि या विषयातील गंमत जाणून त्याची भीती दूर करण्याचा प्रयत्न या गणिती वारीच्या माध्यमातून केला जाणार आहे.
२८ जूनला श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा बारामती शहरात मुक्काम असणार आहे. त्या दिवशी सकाळी पालखी उंडवडी मुक्कामाहून निघेल आणि संध्याकाळपर्यंत बारामती येथे पोचेल. या प्रवासात बारामतीतील गणितप्रेमींची गणिती वारी या पालखीसोबत असणार आहे.
गणिताचे मानवी जीवनामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहेच तसेच निसर्गातील असंख्य गोष्टी या गणिती सूत्रावरच चालत आहेत.आपण सर्वांनी या निमित्ताने एकत्रित येऊन गणिती वारीचा आनंद घ्यावा असे आवाहन यानिमित्ताने या गणिती वारीच्या आयोजकांनी केले आहे.
सकाळी सहा वाजता उंडवडीपासून या गणिती वारीला सुरुवात होईल. दुपारी ब-हाणपूर या ठिकाणी भोजन व विश्रांती असेल तर रात्री तांदूळवाडी रोड येथील जिजामातनगरमधील मयुर निवास या ठिकाणी दिंडी सोबत महाप्रसादाचा लाभ घेतला जाईल
या वारीच्या माध्यमातून गणिताचे व्यावहारिक महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच गणिताविषयी असणारी विद्यार्थ्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न होईल. गणित हा फक्त अभ्यासक्रमातील विषय नसून ती एक कला आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवले जाईल.गणितीय सूत्र ,गणिती म्हणी ,गणिती वाक्यप्रचार यांचा प्रचार व प्रसार केला जाईल .
या गणिती दिंडीमध्ये जास्तीत जास्त गणिती प्रेमी, गणिताची आवड असणाऱ्या व्यक्तींनी सहभागी व्हावे ही विनंती आयोजकांनी केली आहे. दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आयोजकांचे मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शरद भोसले -9763120121, रोहन बिडवे – 9527649696 ,नितीन साळुंके – 8888212261, विद्या भोसले -9763510001,ज्ञानेश्वर फाळके – 9096300348.