पुणे : महान्यूज लाईव्ह
पावसाची सगळेजण अत्यंत आतुरतेने वाट पहात आहेत. आला, आला म्हणत असतानाही पाऊस अजून आलेला नाही. पुणे शहर आणि जिल्ह्यातही त्याची प्रतिक्षा आहे. मात्र हवामान खात्याच्या नव्या इशाऱ्यानुसार उद्यापासून ( दि.२० ) २४ तारखेपर्यंत ५ दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे म्हणले आहे.
पुणे शहरात १ मार्च ते १० जून या ९० दिवसात एकही पाऊस पडलेला नाही. जिल्ह्यातही तुलनेने जून महिन्यात फारच कमी पाऊस पडलेला आहे. जून महिन्याच्या १८ दिवसात फक्त २८ मीमी पावसाची नोंद झालेली आहे.
पण आता परिस्थिती बदलली असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पुणे शहरातील हवेचा दाब आता कमी झाला आहे. आता वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेले काही दिवस १००६ हेक्टा पास्कल असलेला हा दाब आता १००२ हेक्टा पास्कलपर्यंत आला आहे. त्यामुळे आता पुणे जिल्ह्याच्या आकाशात बाष्पयुक्त ढगांची गर्दी झाली आहे.
हवामान खात्याने घाटमाथ्यावर मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच २० ते २४ जून या पाच दिवसात पुणे शहरासह पुणे जिल्ह्यासाटी ‘ यलो अलर्ट ‘ दिला आहे. म्हणजेच या पाच दिवसात या सगळ्या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरवा असेच या पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सगळ्यांना वाटते आहे.