पुणे : महान्यूज लाईव्ह
दहावी, बारावीच्या निकालाची आपल्याला मोठी उत्सुकता असते. आता यातील सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या मुलांची यादी प्रसिद्ध केली जात नाही, पण काही वर्षापर्यंत ती प्रसिद्ध होत असे. त्यात टॉपवर असणाऱ्या मुलांच फार कौतुक व्हायचे. या परिक्षात पहिला, दुसरा नंबर मिळविणाऱ्या मुलांच पुढच सगळ आयुष्यच सोपे असेल अस वाटायच. पुढच्या सगळ्या आयुष्यात ही मुल टॉपवरच असणार, असे वाटायचे. पण प्रत्यक्षात अस असत का? दहा वर्षापुर्वी म्हणजे २०१२ साली दहावी आणि आयसीएससी बोर्डात पहिल्या आलेल्या मुलींची सोशल मिडियावरून मिळालेली माहिती मात्र वेगळेच काही सांगते आहे.
२०१२ साली एसएससी बोर्डाच्या परीक्षेत ऋतुजा दोशी हिने १०० टक्के गुण मिळविले होते. याच वर्षी आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत ठाण्याच्या शलाका कुलकर्णीने ९८.८ टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला होता. या दोन्ही मुली सध्या कुठे आहेत, आणि काय करताहेत ?
ऋतुजा दोशी सध्या बंगळुरूमध्ये असते. तिने दादरच्या बालमोहन शाळेतून दहावी केली. ते केवळ अभ्यासातच हुशार नव्हती तर तिला खेळाचीही आवड होती. ती एक उत्तम बेसबॉल खेळाडू होती. राष्ट्रीय पातळीवर बेस बॉल खेळल्याने तिच्या गुणांमध्ये स्पोर्ट्ससाठीचे गुणही ग्राह्य धरण्यात आले. त्यामुळेच तिचा निकाल १०० टक्क्यांपर्यंत पोचला.
सगळ्या हुशार मुलांप्रमाणे तिनेदेखील सायन्सला प्रवेश घेतला. बारावीत तिने ९४ टक्के गुण मिळवले. त्यानंतर ती आर्किटेक्टचे पदवीचे शिक्षण घेतले. पण आर्किटेक्ट म्हणजे काय आणि हे काम आपल्या आवडीचे आहे का, याबाबतचा गोंधळ आर्किटेक्टची पदवी हातात मिळाली तरी कायमच होता. तिला आर्किटेक्ट म्हणून काम करण्यात अजिबात रस नव्हता.
आपल्याला फिल्म मेकींगशी संबंधित कामात आपले मन रमते आहे, असे तिला लक्षात आले. आर्किटक्ट म्हणून शिकत असतानाही तिला कविता, साहित्य, फोटोग्राफी या विषयात रस निर्माण झाला होता. यानंतर तिने पुण्याच्या एफटीआयआय मधून फिल्म अप्रिसिएशनचे कोर्सेस केले.
आपल्याला नेमके काय आवडते याचा आपल्याला अंदाज येईपर्यंत आपण कुठलीतरी वाट चालू लागलेलो असतो. काही काळानंतर आपल्याला त्या वाटेने चालणे नकोसे वाटू लागते. पण तिथे परत फिरून नवी वाट धुंडाळणे हे प्रत्येकाला शक्य होतेच असे नाही. बरेच जण नाईलाजाने आहे तीच वाट चालत राहतात. फार थोडे लोक आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा निर्णय घेऊ शकतात.
यामुळे प्रत्यक्ष शिक्षण एका क्षेत्रात आणि करियर दुसऱ्याच क्षेत्रात करणारी अनेकजण आपल्याला दिसतात. ऋतुजाचेही असेच झाले. आर्किटेक्टची पदवी घेऊन आता ऋतुजा बंगळूरूमध्ये डॉक्युमेंट्री मेकींगचे काम करते आहे.
दहावी, बारावीला चांगले मार्क मिळण्यासाठी जरूर प्रयत्न करावेत. त्यातून तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पण त्यावर सगळे आयुष्य अवलंबून नाही. काही काळानंतर ह्या मार्कांना काही किंमत उरत नाही. तुम्ही तुमचे आताचे काम कसे करता आहात, यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात.
मला १०० टक्के मिळाल्यावर मी सायन्सला प्रवेश घेतला. मला त्याची आवड आहे की नाही हेदेखील मी पाहिले नाही, असे ऋतुजा म्हणते. खरे तर मला कला शाखेत रस होता, पण हे मला कळण्याचा कोणताच मार्ग त्यावेळी मला मिळाला नाही. आताच्या मुलांनीही आपली आवड काय आहे, हे ओळखून त्यानुसार काळजीपुर्वक आपले क्षेत्र निवडावे, असेही ती म्हणते.
याचवर्षी आयसीएससीच्या परीक्षेत पहिली आलेली शलाका कुलकर्णी सध्या नूयॉर्कमध्ये असते. तिने दहावी टॉप केली, त्यानंतर जेईई अॅडव्हान्स ही परीक्षाही टॉप केली. तिथे ती देशभरात मुलींमध्ये पहिली आली होती.
त्यानंतर तिने आयआयटी बॉम्बेमधून इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेकची पदवी मिळवली. ही चारही वर्षे ती मुलीमध्ये पहिला क्रमांक मिळवत होती. शलाका केवळ अभ्यासातच नव्हे तर इतर उपक्रमातही हिरीरीने सहभागी होत असे. आयआयटी बॉम्बेमध्ये ती मूड इंडिगो या फेस्टिव्हलची मॅनेजरही होती.
त्यानंतर तिची नामांकित येल विद्यापीठात स्कॉलरशीपसाठी निवड झाली. जगभरातून निवडल्या गेलेल्या १२ विद्यार्थ्यांमध्ये ती होती. या विद्यापीठातून तिने एमबीए पुर्ण केले.
बोर्डात आल्यानंतर पेढे, हारतुरे, मुलाखती आणि सत्कार हे काळ चालते. त्यानंतर पुन्हा नेहमीचे आयुष्य सुरु होते. असे शलाका म्हणते. माझ्यासाठी अभ्यास करणे कधीच कठीण नव्हते. माझ्यासाठी अभ्यास किंवा शिक्षण हे नवीन काहीतरी शिकण्यासाठीचा प्रवास होता. अभ्यास करण्यात मला आनंद वाटायचा असेही ती म्हणते.
मात्र अभ्यासात हुशार म्हणजे मेहनत करायची गरज नाही, असे मात्र नाही. हुशार मुले खरे तर अभ्यास समजून घेतात आणि स्मार्ट वर्क करतात. त्यामुळे त्यांचे सादरीकरण जास्त प्रभावी होऊन त्यांना अधिक चांगले गुण मिळतात.
बोर्डाच्या परीक्षेसाठाची अभ्यास म्हणजे त्या वर्षापुरता निकाल मिळविण्यासाठीच आहे असे समजण्यापेक्षा आयुष्यभराच्या टप्प्यातील तो एक प्रवास आहे असे समजून तो केला पाहिजे. तिथे जेवढी मेहनत घेतली जाईल, तेवढी पुढे आयु्ष्यभर कामी येईल. असा दृष्टीकोन असेल तर आयुष्यातील कोणत्याही परीक्षेत यशस्वी होता येईल, असेही शलाका म्हणते.