दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीच्या विविध निधीतून सुरू असलेल्या विविध विकास कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायत सदस्य दुसऱ्या ठेकेदाराच्या नावाखाली स्वतः काम करीत असल्याने या कामे निकृष्ट होत असुन कामांचा दर्जा खालावत आहे आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते ह्या विकासकामांचे उद्घाटन कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडले होते.
पाटस परिसरात अंबिकानगर येथे जिल्हा परिषदेच्या २० टक्के निधीतून २ लाख ९८ हजार ९९२ रुपयांचा निधीतून सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्यांचे काम करण्यात आले. मात्र अवघ्या सहा महिन्यांच्या आतच आणि पावसाळ्यापूर्वीच या रस्त्यांची खडी ठिकठिकाणी उखडली आहे. बारीक बारीक खडी वरती आल्याने इतरत्र पसरली आहे. संबंधित ठेकेदाराने हे काम करताना सिमेंट कमी वापरले असून काम करताना ह्यावर पाणी मारले नसल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिक करीत आहे. हे काम पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या एका अधिकारी च्या जावयाला दिले होते. त्यामुळे या कामाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. मात्र या ठेकेदारावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करून ठोस अशी कारवाई करून काळ्या यादीत नाव टाकण्याची मागणी या परिसरातील नागरिक करीत आहे.
मध्यंतरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासमोरील डांबरीकरण रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते यासंदर्भात महान्युजने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने हे काम पुन्हा केले. अशी अनेक विकास कामे सुरू असुन ती निकृष्ट पध्दतीने केली जात आहे. पाटस परीसरातील वाड्या-वस्त्यांवर सुरू असलेल्या अंतर्गत भुयारी गटारे तसेच डांबरीकरण व सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्यांची कामेही निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करीत आहेत. हे कामे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य हे दुसऱ्या ठेकेदाराचे नाव पुढे करून स्वतः करीत असल्याची चर्चा परिसरात आहे.
तसेच लाखो रुपयांचा निधी खर्च करून केलेल्या फुले – शाहू – आंबेडकर अभ्यासिका इमारतीचे बांधकामही अंदाजपत्रकानुसार केले नसून निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र राजकीय दबावामुळे हे काम तसेच रेटून नेले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार त्यांच्यात आर्थिक तोड होत असल्याने त्यांच्यावर ठोस अशी कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. दरम्यान, पाटस ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी उपलब्ध होत आहे, मात्र स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद व ग्रामपंचायत स्तरावर आर्थिक मलईसाठी ही कामे निकृष्ट होऊनही दुर्लक्ष केले जाते. परिणामी लाखो रुपयांचा निधी वाया जात आहे.
दरम्यान, कामे सुरू होण्यापूर्वी या कामांची माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते उद्घाटने झाली आहेत. तर समाज कल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्वशील शितोळे, पंचायत समितीच्या माजी सभापती आणि सदस्या आशा शितोळे,सरपंच अवंतिका शितोळे हे ही या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात उपस्थित होते. विकास कामे हे कुणी का करेना, कोणत्याही ठेकेदार मार्फत का होईना करा , पण ही कामे चांगल्या दर्जाचे व्हावेत अशी अपेक्षा नागरिकांची आहेत.