नागपूर : महान्यूज लाईव्ह
समजा तुम्ही एटीएममधून ५०० रुपये काढण्यासाठी गेले आहात, पण तुम्हाला मिळताहेत २५०० रुपये. अशावेळेस तुमची काय अवस्था होईल. अशीच स्थिती नागपूरजवळील खापरखेडा गावातील लोकांची झाली होती.
नागपूरजवळील खापरखेडा येथील एका खाजगी बॅंकेच्या एटीएममध्ये एक ग्राहक पैसे काढण्यासाठी गेला. त्याला एटीएममधून ५०० रुपये मिळण्यासाठी प्रोसेस केली. पण प्रत्यक्षात आले २५०० रुपये. पण त्याच्या बॅंक खात्यातून मात्र ५०० रुपयेच वजा झाले. त्याने हाच प्रकार पुन्हा एकदा केला आणि परत एकदा २५०० रुपये मिळविले.
अलीबाबाची गुहा सापडल्याचा झालेला आनंद तो ग्राहक काही लपवून ठेऊ शकला नाही आणि काही वेळातच त्या एटीएमसमोर लोकांची गर्दीच गर्दी झाली. अनेकांनी आपले नशीब अजमावून पाहिले आणि पाचपट रक्कमही मिळविले. पण काही जागरूक नागरिकांनी हा सगळा प्रकार पोलीसांना कळवला. पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी ते एटीएम बंद केले. त्यांनी संबंधित बॅंकेलाही या प्रकाराची कल्पना दिली.
बुधवारी ( दि. १५ ) रोजी घडलेल्या घटनेने चांगलीच खळबळ माजवून दिली. मात्र नंतर हा सगळा प्रकार एटीएममध्ये रक्कम ठेवणाऱ्या व्यक्तीच्या चुकीने झाल्याचे लक्षात आले. या व्यक्तीने चुकीने जिथे १०० रुपयांच्या नोटा ठेवायच्या त्या कप्प्यात ५०० रुपयांच्या नोटा ठेवलेल्या होत्या. त्यामुळे मशीनही १०० ची नोट समजून ५०० च्या नोटा सोडत होते.
आता ज्या लोकांनी पाचपट रक्कम घेतलेली आहे, त्यांच्याकडून ही रक्कम पुन्हा वसूल करण्यासाठी बॅंकेने कारवाई सुरु केली आहे.