महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड भागासह देशाच्या विविध भागात जिथे जिथे जंगलाचा भाग आहे, त्या ठिकाणी जंगली प्राण्यांकडून होत असलेल्या हल्ल्याच्या घटना आपण नेहमी ऐकतो. मात्र आसाम राज्यात अशी एक घटना घडली, जिथे एक सायकलस्वार निघाला होता आणि त्याच्या अंगावर चक्क बिबट्याने झेप घेतली. मात्र सायकलमध्ये अडकल्याने बिबट्यानं धूम ठोकली. अत्यंत अविश्वासार्ह रित्या बचावलेल्या या सायकलस्वाराचा व्हिडिओ सध्या भारतातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घालतो आहे.
जगभरातील वन्यप्राणी, खेळ आणि पर्यावरण विषयक व्हिडिओ शेअर करून जनजागृती करणाऱ्या रेक्स चॅपमन यांनी भारतातील आय एफ एस अधिकारी परविन कास्वान यांनी शेअर केलेला इंडिपेंडेंट टीव्ही चा व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.
परविन कास्वान यांनी दोन दिवसापूर्वी हा व्हिडिओ शेअर करून सायकलस्वाराच्या अभूतपूर्व जीवदानाची चर्चा केले आहे. इंडिपेंडेंट टीव्ही ने याविषयी चा व्हिडीओ वाचकांसमोर आणला होता. आसाम मधील एका रस्त्यावरचे हे चित्र असून लाल रंगाचा शर्ट घालून सायकल स्वार निघाला असताना अचानक झाडीच्या आतून रस्त्यावरती बिबट्याने झेप घेतली.
ती सरळ त्याच्या सायकलवर पडली. सुदैवाने त्याच्या कंबरेला व हाताला बिबट्याची नखे लागली आणि तो सायकलवरून पडला. मात्र बिबट्याला ही सायकल म्हणजे अनपेक्षित प्रतिकार वाटला असावा, कारण त्याचे पाय सायकल मध्ये अडकल्याने त्याने धूम ठोकून तो तिथून निघून गेला. त्यानंतर गडबडीत भांबावलेल्या सायकलस्वाराने सायकल वळवून पुन्हा माघारी आणली आणि कोठे कोठे जखमा झाल्या आहेत ते पाहण्यास सुरुवात केली.