शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यात पोलिस विभाग हा दिवसेंदिवस लाचखोरीत अधिकच बदनाम होत असून नुकत्याच एका सहायक पोलिस निरीक्षकावर तब्बल दोन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत नुकताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात ठेकेदाराचे नियमित काम चालू राहावे व थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक देविदास हिरामण कारंडे याने दोन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
रांजणगाव एमआयडीसीमधील अनेक कारखान्यात स्थानिक युवक ठेकेदार म्हणून काम करतात मात्र अनेकवेळा कारखान्याकडून पैसे मिळायला उशीर होतो, त्यामुळे अनेकदा पोलिसांकडून कारखान्याच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो. याप्रकारे एका अज्ञान तक्रारदाराकडे सहायक पोलिस निरीक्षक देविदास कारंडे याने लाचेची मागणी केल्याची तक्रार ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांचे रांजणगांव येथील एका कंपनीकडे लेबर कॉन्ट्रक्ट असून सदर कॉन्ट्रॅक्टप्रमाणे कंपनीकडील थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी व कंपनीशी पुढील करार चालू ठेवण्याच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्याविरूद्ध कारवाई न करण्यासाठी आरोपी सहायक पोलिस निरीक्षक देविदास कारंडे याने तक्रारदार यांचेकडे दोन लाख रूपये लाचेची मागणी केली होती.
त्यानुसार रांजणगाव पोलिस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारंडे याला ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने तपास करत आहेत.
शिरूर तालुक्यात यापूर्वीही अनेकदा पोलिस विभागात लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाया केल्या आहेत. महसूल,भूमिअभिलेख आदी विभागां बाबत नागरिकांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी दिल्यानंतर त्याची पडताळणी करून लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाया करून पैसे मागणाऱ्या सरकारी लोकसेवकाला अटक केली आहे. पोलिस विभागात देखील लाच मागण्याचे प्रमाण असून ही “भूक”लाखोंमध्ये असल्याचे दिसून येते.
शिरूर तालुक्यात वाढलेले औद्योगिकीकरण,आलेली सुबत्ता त्या बदल्यात वाढलेली गुन्हेगारी यामुळे दिवसेंदिवस नवे आव्हान असताना तर दुसरीकडे तालुक्याचा चेहरा बदलत असताना लाचखोरीमुळे साहेबांपुढे फाईल पुढे ढकलताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही दखल घेणे गरजेचे असल्याचे मत सजग नागरिक व्यक्त करत आहे.
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास काय करायचे ?
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी लाचेची मागणी केल्यास १) हेल्पलाईन क्रमांक(टोल फ्री) : १०६४
२) अँटी करपष्ण ब्यूरो दूरध्वनी क्र. ०२०- २६१२२१३४, २६१३२८०२,२६०५०४२३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.