दिल्ली : महान्यूज लाईव्ह
नितीन गडकरी गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीबद्दल चर्चेत असतात. आतादेखील दळणवळण व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी एका कार्यक्रमात दिल्ली येथील एका कार्यक्रमात बोलताना एका धडाकेबाज योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एक नवीन कायदा आणतोय; त्यानुसार जो कोणी चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या गाडीचे फोटो पाठवेल त्याला पाचशे रुपयांचे बक्षीस मिळणार आहे..!
चुकीच्या पद्धतीने गाडी पार्क केल्यास अशा वाहनचालकाला एक हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. त्यामधील पाचशे रुपयांची रक्कम ही ज्या व्यक्तीने ही माहिती दिली आहे, अशा व्यक्तीला मिळणार आहेत. त्यामुळे लोकांनी, लोकांसाठी चालवलेल्या लोकशाहीत पुन्हा एकदा स्वयंशिस्त ही लोक आपापसातच पाळतील याकडे महत्त्व देण्यासाठी ही अफलातून योजना असेल.
दिल्ली मधील औद्योगिक परिषदेत गडकरी बोलत होते. ते म्हणाले, सध्या प्रत्येक कुटुंबाकडे चार चाकी वाहने आहेत. मात्र एवढी पार्किंग इमारतीमध्ये नाहीत. अशावेळी दिल्लीमध्ये देखील मोठ्या रस्त्यांना पार्किंगचे स्वरूप येत आहे. नागपूर मध्ये आमच्या घरी 12 वाहने पार्क करण्याची व्यवस्था असून, एकही वाहन रस्त्यावरती पार्किंग करत नाही. अशा स्वरूपाची टिप्पणी गडकरी यांनी केली.
त्यांनी हेही सांगितले की, आता इलेक्ट्रिक वाहने ही भारताची गरज आहे. एवढेच नाही तर सफाई कामगार देखील अमेरिकेमध्ये त्यांची कार बाळगून असतात. भारतामध्ये देखील ही परिस्थिती लवकरच येईल. प्रत्येकाकडे कार खरेदी करण्याएवढी त्याची आर्थिक शक्ती असणार आहे. अशावेळी वाहनांसाठी शिस्त ही अतिशय गरजेची राहणार आहे.