मुंबई : महान्यूज लाईव्ह
२०१४ च्या निवडणुकीत स्वीस बॅंकांमध्ये असलेल्या भारतीयांच्या पैशाची खुप चर्चा होत असे. हा पैसा जर भारतात आणला तर सगळा भारत एकदम सुजलाम सुफजाम होईल असे सांगितले. याच पैशाच्या जोरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. रामदेवबाबाही या स्वीस बॅंकातील पैशावर भरपुर बोलायचे.
निवडणूक संपल्यानंतर नरेंद्र मोदींचे सरकार आल्यावर या विषयावर चर्चाच बंद झाली. त्यानंतर नोटबंदीचे असले नसलेले फायदे सांगताना पुन्हा या स्वीस बॅंकाचा उल्लेख होऊ लागला. नोटबंदीचा फटका या स्वीस बॅंकातील पैशालाही बसणार असे त्यावेळी सांगितले जात होते. पण आता पुढे आलेल्या आकडेवारीवरून स्वीस बॅंकातील भारतीयांचे पैसे कमी तर झालेलेच नाहीत, उलट गेल्या चौदा वर्षातील सर्वाधिक रकमेपर्यंत पोचले आहेत.
स्वित्झलंड सेंन्ट्रल बॅंकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार स्वीस बॅंकांमध्ये भारतीयांची ३.८३ बिलियन स्वीस फ्रॅंक म्हणजेच ३०५०० कोटी रुपये इतकी रक्कम आहे. यातील विशेष बाब म्हणजे फक्त एका वर्षात ही रकमेत जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. २०२० मध्ये ही रक्कम २.५५ बिलियन स्विस फ्रॅंक म्हणजेच २०७०० कोटी होती.
नोटबंदीमुळे काळा पैसा कमी होईल असे सांगितले जात होते. मात्र नोटबंदीनंतरच स्वीस बॅंकातील भारतीयांच्या बॅंक खात्यातील रकमांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. २००६ मध्ये स्वीस बॅंकातील भारतीयांची रक्कम ६.५ बिलीयन स्वीस फ्रॅंक इतकी होती. त्यावेळची ती त्यावेळेपर्यंतची सर्वात जास्त रक्कम होती. पण त्यानंतर काही वर्षे ही रक्कम कमी होत होती. मात्र त्यात पुन्हा वाढ होत गेली आहे.