सोमेश्वरनगर : महान्यूज लाईव्ह
प्रत्येकाला आवडते आपली शाळा.. ज्या शाळेतून शिकून विद्यार्थी आयुष्यात पुढे काही स्थिरावण्याचा प्रयत्न करतो; मोठे होण्याचा प्रयत्न करतो; स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतो; तो विद्यार्थी आयुष्यभर आपल्या शाळेविषयीचे ऋणानुबंध जपत असतो; आयुष्यभर तो आपल्या मनाच्या कुपीत आपल्या शाळेविषयी ममत्व बाळगून असतो आणि म्हणूनच असा विद्यार्थी जेव्हा शाळेत येतो; तेव्हा त्याला जुन्या आठवणी आठवत राहतात.. हे चित्र बारामती तालुक्यातील मु.सा. काकडे महाविद्यालयात रविवारी पाहायला मिळेल.
सन 1972 चा दुष्काळ ज्या विद्यार्थ्यांनी अनुभवला त्यातील अनेक उन्हाळे-पावसाळे बरोबर घेऊन; सन 1992-95 च्या काळातील जातीय विवाद अनुभवलेले विद्यार्थी सामाजिक समरसता बरोबर घेऊन; अगदी कोरोनाच्या काळातही समर्थपणे लढा दिलेल्या आत्ताच्या पिढीपर्यंत अनेकांशी संवाद साधतील. खुला संवाद साधतील. मनापासून भेटतील. मनातल्या जागा मोकळ्या करतील आणि ती जागा असेल मु.सा. काकडे महाविद्यालय..!
मु. सा. काकडे महाविद्यालय व महाविद्यालयाची माजी विद्यार्थी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 1972 ते 2022 या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 19 जून रोजी रविवारी सकाळी दहा वाजता महाविद्यालयात होणार आहे ही माहिती समितीचे अध्यक्ष शहाजीराव काकडे व प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे यांनी दिली.
परिसरात उच्च शिक्षणाची कुठेही सोया नसल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना शिकता यावे म्हणून सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी मुगुटराव काकडे यांनी 1972 साली या महाविद्यालयाची स्थापना केली. ग्रामीण भागाला हे महाविद्यालय वरदान ठरले. बारामती, पुरंदर, फलटण, खंडाळा, इंदापूर, दौंड अशा विविध तालुक्यातून विद्यार्थी या महाविद्यालयात शिकले.
दर्जेदार शिक्षकांमुळे राज्याला, समाजाला महाविद्यालयाने अनेक तंत्रज्ञ, सरकारी अधिकारी- कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, पत्रकार, लेखक, कवी, प्रगतशील शेतकरी, वकील, सामाजिक कार्यकर्ते दिले आहेत. अनेक जण महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहून शिकले, तर अनेक मुली इंदिरा गांधी तंत्रनिकेतनमध्ये राहून शिकल्या.
महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हे सर्व माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. या दिवशी कुठल्याही पाहुण्याला निमंत्रण दिलेले नाही. संपूर्ण दिवस माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी गप्पा गोष्टी, संवाद आणि सुखदुःखाची देवाण-घेवाण यातच व्यतीत करणार आहेत. याशिवाय महाविद्यालयाच्या मागील पन्नास वर्षाचे ‘मुकुट’ नियतकालिकाचे अंक, पन्नास वर्षातील जुने फोटो, लेख याचे प्रदर्शन भरविले जाणार आहे.
पहिल्यांदाच महाविद्यालयात इतक्या मोठ्या प्रमाणात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे पहिले विद्यार्थी व सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे राहणार आहेत. महाविद्यालयाच्या वतीने शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे स्वागत करणार आहेत. असे माजी विद्यार्थी समिती सदस्य एकनाथ पवार, विजयकुमार सोरटे यांनी सांगितले.