बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील बाजारपेठेच्या रस्त्यावर एक माणूस दोन महिलांना लाथा बुक्क्यांनी मारत असल्याची आणि ते बघून न बघितल्यासारखे करून लोक निघून जात असल्यची पोस्ट सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार आनंद धोंडगे यांनी सोशल मिडियावर केली आहे. बारामतीसारख्या सुसंस्कृत शहरातील या रस्त्यावर हा प्रकार दररोज होत असल्याची माहिती आहे. बारामतीचे प्रशासन आणि पोलीस याची दखल घेतील का?
आनंद धोंडगे यांची पोस्ट खालीलप्रमाणे आहे,
‘ बारामती शहरात सरेआम महिलेवर अत्याचार होत आहे. बारामती शहरात सिनेमा रोडवर डॉ. पोळ व निलेश ड्रग हाऊस दुकानाच्या बाहेर एक व्यक्ती दोन महिलांना लाथा बुक्क्यांनी मारत आहे. ती महिला जोरजोरात ओरडत आहे. अगदी रक्त येईपर्यंत ती व्यक्ती तोंडावर फटके मारत आहे. पण त्या स्त्रीचे ओरडणे ऐकून लोक बघतात व तसेच पुढे निघून जातात. मार खाऊन त्या स्त्रीचे तोंड पूर्ण सुजलेल्या अवस्थेत होती अशी माहिती महाराज्य टाइम्सचे संपादक आनंद धोंडगे यांना दिली.
आता प्रश्न पडतो की, महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करणारे या महिलांना त्या नराधमाच्या तावडीतून मुक्त करून त्यांना सुधारगृहात पाठवतील का? एखाद्या स्त्रीला छेड काढली तरी गुन्हा दाखल होतो मग या नराधमावर पोलिस त्याला कडक शासन करणार का ?
दरम्यान पत्रकार आनंद धोंडगे यांना संपर्क साधला असता, त्यांनी आपण हा प्रकार काल ( ता. १६ ) रोजी रात्री ८.३० ते ९ च्या दरम्यान प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले. ही व्यक्ती त्या दोन तरुण मुलींना आसपासच्या हॉटेलमधून भीक मागून खायला आणण्यास लावते, तसेच भीक मागून पैसेही आणण्यास लावते. जर हे काम केले नाही तर या दोघींना लाथाबुक्क्यांनी मारहाण करते असेही आनंद धोंडगे यांनी सांगितले.
या फेसबुक पोस्टप्रमाणे खरोखरच परिस्थिती असेल तर ती बारामती शहरासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. बारामतीसारख्या शहरात असा प्रकार घडू नये यासाठी सर्व सुजाण नागरिकांना याविरोधात आवाज उठवणे अत्यंत गरजेचे आहे.