दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या महिला कर्मचारी यांना अरेरावी व दमटाटी केल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा चेतना सोनवणे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
याबाबत माहिती अशी की, दौंड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागात काम करत असलेल्या महिला कर्मचारी राणी लक्ष्मण कोकणे या बुधवारी ( दि १४ ) आपल्या टेबलवर कामकाज करीत असताना चेतना सोनवणे ( पुर्ण नाव माहीत नाही. रा. दौंड ) या त्रयस्थ व्यक्तीचा अर्ज घेवुन आल्या. तेव्हा ज्या व्यक्तीचा अर्ज आहे त्या व्यक्तीला पाठवुन दया. व अगोदर ४० रू. चे चलन भरा.’ असे राणी कोकणे या त्यांना समजावुन सांगत असताना त्यांनी टेबलावर हाताने आपटुन, टेबलावरील कागदपत्रे विस्कटुन कागदपत्रे खाली पाडुन शिवीगाळ करून ‘ तु लई शहाणपणा करतेस, तुझेकडे बघुनच घेते.’ असे म्हणुन धमकी दिली. तसेच अंगावर येवुन हाताने मारहाण करून शिवीगाळ केली असल्याची फिर्याद राणी कोकणे यांनी दौंड पोलीस स्टेशनला दिली आहे.
चेतना सोनवणे यांच्यावर सरकारी कामात अडथळा करणे, शिवीगाळ व दमटाटी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चेतना सोनवणे या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा आहेत अशी माहिती समोर येत आहे. या घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.