सांगोला : महान्यूज लाईव्ह
राजकीय पुढारी निवडणूकांच्या वेळी मोठा खर्च करतात, जेवणावळी घालतात. पण निवडणूक संपल्यावर मतदाराला दिलेली आश्वासने जशी विसरून जातात, तशीच या जेवणावळीसाठीचे देणेही विसरून जातात. यामध्ये संबंधित कार्यकर्ता, हॉटेलमालक यांची मोठी कुचंबणा होते. बहूतेक वेळा या गोष्टी उघड होत नाहीत. पण पुर्वाश्रमीचे शेतकरी संघटनेचे आणि सध्याचे भाजपाच्या जवळचे नेते सदाभाऊ खोत यांच्याबाबतील मात्र असे घडले नाही. २०१४ सालच्या निवडणूकीत घाललेल्या जेवणावळीची उधारी अजून दिली नाही म्हणून एका हॉटेलचालकाने सदाभाऊना भर रस्त्यात अडवले.
सांगोला येथे घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
एकतर विधान परिषद निवडणूकीतून माघार घ्यावी लागल्याने सदाभाऊंचे कार्यकर्ते चांगलेच नाराज आहेत. त्यातच सांगोला पंचायत समितीच्या आवारात अशोक शिणगारे या हॉटेलचालकाने थेट माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनाच अडवले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशोक शिणगारे यांनी सदाभाऊंसाठी जेवणावळी घातल्या होत्या. त्याचे पैसे अद्याप त्यांना मिळालेले नाहीत. त्यावेळी सदाभाऊंचे कार्यकर्ते असलेल्या अशोक शिणगारे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोरच सदाभाऊंना अडवले. ‘ आधी उधारी द्या, मग पुढे जावा ‘ असे म्हणत त्यांच्याशी हुज्जत घातली. सदाभाऊंच्या कार्यकर्त्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण शिणगारे काही ऐकायला तयार नव्हते.
अखेर सदाभाऊ खोत गाडीतून उतरले आणि शिणगारे यांच्याशी बोलले. कशीबशी त्यांनी आपली सुटका करून घेतली. पण या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
राजकारण्यांचे असे पैसे बुडवणे ही खरे तर सगळीकडची समस्या आहे. ज्यांना असा फटका बसतो, त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. क्वचित कधीतरी असा त्याचा स्फोट होताना दिसतो.