बारामती : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी सोसायटी कंपाऊंडच्या बाहेर आलेल्या झाडांच्या फांड्या तोडणे दोन जणांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. त्यांच्याविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामतीमधील भिगवण रोडवरील सहयोग सोसायटीमध्ये अजित पवारांचे निवासस्थान आहे. या सोसायटीच्या कंपाऊंडच्या आत असलेल्या झाडांच्या फांद्या या कंपाऊंडबाहेर आल्या होत्या. या फांद्या काहीजण तोडत असल्याचे संतोष वाबळे यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत संबधित व्यक्तींना विचारणा केली. त्यांनी त्यांनी दिलीप जगदाळे यांच्या परवानगीने झाडाच्या फांद्या तोडत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना तुमच्याकडे झाले तोडण्यासाठी परवाना आहे का याचीदेखील त्यांनी माहिती घेतली. पण संबंधित व्यक्तींकडे असा परवाना नव्हता.
त्यानंतर काहीजण या तोडलेल्या फांद्या घेऊन जाताना दिसले. फायकस जातीच्या झाडाच्या २० ते २५ फांद्या तोडल्याचे आढळून आले. त्यानंतर संतोष वाबळे यांनी पांडरुंग माने आणि दिलीप जगदाळे यांच्याविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
आता या प्रकरणी चोरी तसेच महाराष्ट्र झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम १९७५ चे कलम २१ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.