पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्यासह इंदापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक..!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर गावच्या हद्दीत इंदापूर पोलिसांनी आज ( दि. १५ जून) पहाटे कर्नाटक राज्यातून पुण्याकडे जाणारा २५ लाख ७५ हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा व २५ लाख रुपयांचा वाहतूक करणारा ट्रक असा एकूण ४९ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलिसांनी लाखो रुपयांच्या गुटख्यावर व वाहतूक करणाऱ्या ट्रकवर महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर यांनी इंदापूर पोलीस स्टेशनची सूत्रे हातात घेतल्यापासून वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अनेक धाडसी कारवायांमुळे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर व इंदापूर पोलीस खात्याचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा वाहतूक करणारा ट्रक कर्नाटक कडून पुण्याकडे जात असताना इंदापूर पोलिसांनी लोणी देवकर येथे या संशयित ट्रकची तपासणी केली असता इंदापूर पोलिसांना ट्रक मध्ये अवैध गुटखा दिसून आला.यामध्ये इंदापूर पोलिसांनी ट्रक चालक व मालक या दोघांवरती भारतीय कलम ३२८ व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली आहे.
ही कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदशनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, हवालदार अमोल खैरे, सुनील बालगुडे, महेंद्र पवार, मोहम्मद अली मड्डी, बापूसाहेब मोहिते, सलमान खान, जगन्नाथ कळसाईत, विशाल चौधर, लक्ष्मण सूर्यवंशी, अकबर शेख, पोलीस मित्र महादेव गोरवे, शुभम सोनवणे, हनुमंत मोटे, भाऊ कांबळे, अनिल शेवाळे यांनी केली.