शिरूर : महान्यूज लाईव्ह
बैलगाडा अपघातात गंभीर झालेल्या युवकाच्या मदतीला संपूर्ण गाव धावून आले असून गावकऱ्यांच्या रूपाने माणुसकीचे दर्शन करडे ग्रामस्थांनी घडविले आहे.
काही दिवसांपूर्वी भोसरी येथे भव्य बैलगाडा शर्यंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करडे (ता.शिरूर) येथील प्रणव ज्ञानेश्वर वाळके (वय १८)हा युवक आपल्या मित्राला बैलगाडा जुंपण्यास मदत करण्यास गेला होता. गाडा जुंपताना बैलाने अचानक उसळी मारल्याने प्रणवला जोराचा मार लागला होता.
यावेळी प्रणव जागेवरच कोसळला व बेशुध्द पडला. उपस्थितानी त्याला त्वरित भोसरी येथे एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. त्यावेळी त्याच्या लहान मेंदुस मार लागल्याचे निदान करण्यात आले व पुढील उपचारांसाठी साधारण ९ लाख रुपयांचा खर्च येणार असे सांगण्यात आले होते.
प्रणव हा आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. याचे आई – वडिल शेती व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे उपचाराचा एवढा खर्च ऐकुन वाळके परिवाराच्या पायाखालील वाळुच सरकली. मात्र प्रणवचे मित्र, भावकीतील युवक, ग्रामस्थ युवक यांनी एकत्र येत सोशल मिडियाच्या माध्यमातुन आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मदतीचा ओघ सुरु झाला.
विदयार्थी, गृहिणी, नोकर वर्ग, व्यवसायिक, लोकप्रतिनिधी, आजी – माजी सैनिक, क्रिकेट क्लब, जयंती उत्सव समिती, बैलजाडा मालक आदींनी पुढे येत श्वेच्छेने आपला मदतीचा हात पुढे केला.
यावेळी पन्नास रुपयांपासून पासष्ट हजार रुपयांपर्यंत मदतनिधी गोळा करण्यात आला. त्यामुळे अवघ्या आठवडाभरात तब्बल साडेचार लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. या मदतीमुळे वाळके परिवाराला मोठा दिलासा मिळाला आहे. कोणत्याही ग्रामस्थांच्या अडचणीच्या वेळेला धाऊन जाण्यासाठी तत्पर असलेल्या करडे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले आहे. दरम्यान प्रणवची तब्बेत सुधारत असल्याचे त्याच्या मित्र परिवाराकडुन सांगण्यात आले आहे.
करडे ग्रामस्थांच्या माणुसकीच्या भावनेने दातृत्वाचा तालुक्यात नवा आदर्श निर्माण केला आहे.