बारामती: महान्यूज लाईव्ह
देहूतील शिळामंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही, याची चर्चा राज्यातील समाज माध्यमांमध्ये तर सुरु आहेच; परंतु सामान्य नागरिकांमध्येही सुरू आहे. अजित पवार यांना बोलू न देण्याबरोबरच मुंबईतील कार्यक्रमात तर अजित पवार यांच्यासाठी खुर्ची ठेवण्यात आली नव्हती, या सर्व कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड संताप आहे.
या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावर या विषयी पोस्ट लिहुन संताप व्यक्त केला आहे. अर्थात यामागील कारण सांगताना रोहित पवार यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे.
या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी असे म्हटले आहे की, छत्रपतींचा तसेच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार; म्हणूनच कदाचित भाजपने आजच्या कार्यक्रमात अजितदादांना बोलू दिले नाही.
वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असते. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अहंकाराबद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात अहंकार हा आत्मनाश घडवितो, माणसाला सत्यापर्यंत पोचू देत नाही. अहंकारी मनुष्य ‘आपण मोठे आहोत’ अशी भावना डोक्यात धरून गुरगुरत राहतो आणि असंच काहीसं आज प्रदेश भाजप नेत्यांचं झालं असावे असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजशिष्टाचाराचा भाग म्हणून कालच्या देहू येथील कार्यक्रमात सहभाग घेतला, परंतु मुंबईतील कार्यक्रमांमध्येही उपस्थिती दर्शवली, मात्र भाजपकडून जाणीवपूर्वक केल्या गेलेल्या या खेळीमुळे भाजपचीच जास्त नाचक्की झाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी केली आहे.