सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पंढरपूर तालुक्यातील करकंभ नजीकच्या बादलकोट येथील विकास संभाजी पाखरे या युवकाचा अगोदर खून केला. मग त्याचे हातपाय सिमेंटच्या खांबाला बांधले व इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या पुलावरून हा मृतदेह फेकून दिला. पोलिसांनी मात्र त्यांचे कौशल्य पणाला लावत अवघ्या दोन दिवसात यातील आरोपी शोधले.
वालचंदनगर पोलिसांनी या प्रकरणात नवनाथ श्रीधर नवले, सचिन श्रीधर नवले, साधना नवले, महेंद्र आटोळे, दादा हजारे या पंढरपूर तालुक्यातील बादलकोट गावातीलच पाच जणांना अटक केली आहे. हा खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास हा टेम्पो चालवत होता. तो दररोज बारामती ते मंगळवेढा या रस्त्यावर पशुखाद्याची वाहतूक चे काम करत होता. वरील पाच जणांना गावातील महिलेबरोबर त्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. 10 जून रोजी रात्री विकासला गाठून या पाच जणांनी संगनमताने त्याचा खून केला आणि त्याचे हात पाय दोरीने सिमेंटच्या खांबाला बांधून, हा मृतदेह त्यांनी पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर नीरा नदीच्या पुलावरून फेकून दिला.
त्याचा मृतदेह काही नागरिकांना दिसल्यानंतर त्यांनी वालचंदनगर पोलिसांना याची खबर दिली, पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांना यामध्ये खुनाचा संशय आला. त्यामुळे त्याची पहिल्यांदा ओळख पटवून दोन दिवसाच्या आत या खुनाचा छडा वालचंदनगर पोलिसांनी लावला.
या तपासाच्या प्रक्रियेत पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक बिराप्पा लातुरे, सहायक फौजदार अतुल खंदारे, शिवाजी निकम, बाळासाहेब पानसरे, अभिजीत कळसकर, मोनिका मोहिते, शैलेश स्वामी, रवींद्र पाटमास, प्रमोद भोसले, अजित थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली.