आमची रायगड परिक्रमा आणि आदिवासी पाडा…..
राहूल झाडे, बारामती
तिसरी रायगड परिक्रमा नुकतीच पूर्ण केली. ट्रेक पूर्ण करणं आणि त्याच नियोजन करणं आता अंगवळणी पडलंय. प्रत्येक वेळेस मिळणारी ऊर्जा ही जणू वेगवेगळी असते. पुशू पक्षी, प्राणी जसे अंगावर पडलेलं धूळ, पाणी झटकतात, अगदी तसं हे असे ट्रेक आयुष्यावर आलेली मरगळ झटकायला मदत करतात.
आपल्या दररोजच्या जगण्यातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येणारा अहंभाव, मत्सर, राग, लोभ भरपूर भरला आहे, तो इतका की, एखाद्याने चांगले कपडे जरी घातले तरी, त्याला दोन शब्द ऐकवल्याशिवाय आपलं समाधान होत नाही.
या सर्वांच्या पलीकडे जायला काही मोजके लोकच यशस्वी होतात. त्यांचच आपण संत, गुरू, महात्मे म्हणून पूजन करतो. आजकाल महात्मा तर जाऊ दे, पण माणूस बनायला पण आपण तयार नाही. गावाकडे तरी थोडीफार शिल्लक आहे माणुसकी! पण शहरांमध्ये तर परिस्थिती अजून वाईट आहे.
सांगायचा मुद्दा हा आहे की, रायगड परिक्रमेत एक आदिवासी पाडा लागतो. तिथं गेलो आणि त्याचं जगणं पाहिलं की, मनातल्या मनात हे सगळं स्वतःच आपण जगतोय अस वाटत राहतं. रायगडच्या परिसरात असे अनेक आदिवासी पाडे आहेत, जिथं आजही त्या मुलांच्या अंगावर एकही कपडा नाही. घरात लाईट नाही. दिवा लावावा म्हणलं, तर रॉकेल नाही.
मेणबत्ती आणायला, दोन टाइम चे जेवायला पैसे, सुविधा नाहीत. रायगड परिक्रमेत सगळ्यात जास्त अवघड काय होतं? अस जर मला कुणी विचारलं, तर नकीच म्हणेन की “या बिन कपड्याच्या, शेंबड्या, निरागस पोरांच्या आणि हतबलतेने हे सगळं सहन करणाऱ्या त्यांच्या आईबापांच्या डोळ्यात डोळे घालून बघणे.. हे खरंच खूप अवघड होतं!
रानातला मेवा विकून जेवढं मिळंल, तेवढ्यावरच आयुष्य जगताना त्या माणसांची होणारी घालमेल त्यांच्या डोळ्यात दिसत होती. बरं आपण काही मोठं करावं त्यांच्यासाठी, अस खूपदा मनात आलं, पण आपलीच झोळी फाटकी..! जेवढं त्यांना देऊ शकतो तेवढं दिलं, पण याने काही त्यांचे पिढ्यान् पिढ्यांचे आणि डोंगराएवढे प्रश्न सुटत नाही.
त्यांचं बघून आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर छप्पर, लाईट, पाणी, दोन टाईम जेवण, शिक्षण, WIFI, FB, WhatsApp , Instagram हे सर्व आहे, असं मनात आलं. बरं ज्याच्यापाशी भरपूर आहे, त्याला वेळ नाही, यांचं दुःख घरी घेऊन जायला..! असलं तरी मानवी मनं ही काही पहिल्यासारखी हळवी राहिली नाहीत, कारण जगाने,आजूबाजूच्या वातावरणाने त्यांना तयारच केलंय.. हे सगळं आहे, तिथेच सोडून द्यायला.!
आपण थांबलो तर संपलो आणि सगळं संपेल, या भीतीपोटी जगण्याची अशा लोकांची मॅरेथॉन चालूच आहे. त्यामुळे सुख जवापाडे आणि दुःख पर्वताएवढे अशा संकटाच्या कोंडीमध्ये वाटचाल करत असलेल्या दुर्बलांच्या मदतीला सबळ धावून येताना दिसत नाहीत.
त्यामुळेच रायगडाच्या या परिक्रमेत हे सारे पाहिल्यानंतर, गरीब आणि श्रीमंत यांची दरी ही सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील दर्यान सारखीच खोल आणि उंच निमुळती जाणारी आहे हे लक्षात आले आणि आपण सातत्याने ज्या मुद्द्यावर बोलतो, त्या विकास, योजना, Make in India या अशा कल्पना भंपक आहेत अस वाटायला लागलं.
ट्रेकर्स च्या चॉकलेट, दीड दमडीसाठी वाट बघत बघत ह्या हतबल लेकरांचं आयुष्य त्याच तुटपुंज्या, बिना लाईटच्या, दोन टाइम भातासाठी धडपडणाऱ्या याच गळक्या झोपडीत संपून जाईल. आपल्याला जो आनंद रानमेवा खाऊन होतो, तोच रानमेवा जंगलातून आणताना इथल्या कित्तेक आदिवासींनी रानडुक्कर, हिंस्र जंगली जनावरांनी केलेल्या हल्ल्यात आपला जीव गमावलाय. 100/200 रुपये कमविण्यासाठी दररोज जीवाची बाजी हे लोकं लावतात.
एकही कपडे नसलेलं,नाकातून शेंबूड बाहेर आलेलं, कित्तेक दिवस अंघोळ न केलेलं चांगलं 3/4 वर्षाचं पोरं चॉकलेटसाठी पळत येताना बघितल्यावर जीव तुटत होता. पण हतबल होतो. एक म्हातारी जिच्या घरात लाईट नाही, छप्पर गळतंय, खायला भाकरी नाही, जगाशी काही संपर्क नाही.. छपरामागेच उभ्या असलेल्या रायगडाच्या आधाराने तिनं आयुष्य घालवलं आहे. हे पाहिलं की जीव तीळतीळ तुटतो..!
उघड्या, नागड्या,फाटक्या कपड्यातील 5/6/7 वर्षांची पोरं ज्यांच्या शिक्षणाचा काहीच पत्ता नाही.. चुलीवर फक्त अर्धा कच्चा शिजलेला भात; तो पण म्हातारी म्हणत होती खूप महाग आहे..! 25 रुपये किलो…!भात, मेणबत्ती,भाजीपाला आणायला पैसे नाहीत. संध्याकाळ झाली की, यांचा दिवस संपतो.. कारण दिवाबत्तीला पैशेच नाहीत. जगण्यासाठी कमवावं लागतं.. त्यासाठी कष्ट आणि शिक्षणाबरोबरच चलाखी, हुशारी, द्वेष, मत्सर, राग, असूया, हाव हे सगळ लागतं हे त्यांच्या मनातही नाही.
या लोकांच जगणं जसं आमच्या मित्रांनी कॅमेऱ्यात टिपलं, तसंच त्यांच्या डोळ्यांनी आपली कपडे, आपला नीटनेटकेपणा, बोलण्यात आणि चालण्यात दिसणारा आधुनिकपणा नक्कीच टिपला आहे. आमचे मित्र ऋतुराज काळकुटे आणि राहुल जगताप यांनी काढलेले हे फोटो खूप बोलके आहेत.
त्या लहान पोरांच्या डोळ्यात डोळे घालून बघायची माझी हिम्मत झाली नाही. या निरागस लेकरांची काय चूक? की, ते अशा कुटुंबात जन्माला आले की, जिथं जमीन, आभाळ आणि जंगलाशिवाय काहीच नाही.
या लेकरांच जंगलातल आयुष्य जंगलातच संपेल का काय? अस वाटत राहतं. जर त्यांच्या शिक्षण,लाईट, अन्न, निवारा ह्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या तर नक्कीच ऑलिम्पिक मेडल देणारे Runners, Archers तसेच IAS, IPS देशाला मिळतील. कुठेतरी व्यक्त व्हावं म्हणून लिहीत आहे. नाही तर आपण आपल्या चांगल्या आयुष्याला देखील शिव्या देतच असतो. पण त्या अगोदर नक्कीच या रायगड च्या आदिवासी पाड्याला भेट द्या.
आणि हो फक्त भेट नका देऊ ज्यांची झोळी भरलेली आहे, त्याने कशाचाही विचार न करता थोडी तरी इथे रिकामी करावी ही माफक अपेक्षा….! बाकी, ट्रेक भारीच झाला.. उन वारा, पाऊस, थंडी, थकवा, निसर्ग सगळंच अनुभवलं. परंतु या परिक्रमेत आदिवासी पाड्याला दिलेली भेट माझं सगळं अस्तित्व हादरून टाकणारी ठरली.. आणि जीवनात काहीही परिस्थिती आली तरी अजून मोठा संघर्ष करण्यासाठी ताकद मिळाली हे नक्की…!