मुंबई : महान्यूज लाईव्ह
देशात बेरोजगारी वाढत असल्याचे सध्या उपलब्ध आकडेवारीवरून दिसते आहे. अशा वेळी केंद्रसरकार तरुणांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे. पुढील दीड वर्षात १० लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याचे खुद्द पंतप्रधान मोदी यांनी व्टिट करून सांगितले आहे.
त्यांनी केलेल्या व्टिटनूसार केंद्रसरकारच्या सर्व विभागामध्ये उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानंतर सर्वच खात्यातील मंत्रालयांना आणि विभागांना भरती करण्याबाबतच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. या सर्व विभागात मिळून १० लाख नोकऱ्या पुढच्या दीड वर्षात उपलब्ध होणार आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे नोकरभरती करण्यात आली नव्हती. केंद्र सरकारमध्ये रिक्त पदांची संख्या लाखांच्या घरात गेली होती. ही पदे केव्हा भरणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. आता याबाबत केंद्र दिलासादायक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत पंतप्रधान मोदींनी दिले आहे.
अवघ्या १८ महिन्यात १० लाख लोकांची भरती करायची असल्यास केंद्र सरकारच्या सर्वच विभागांना जलदगतीने काम करावे लागणार आहे. त्यामुळे काही दिवसात यासंदर्भातील प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना लवकरच उत्तम नोकरीची संधी मिळणारा आहे.