पुणे : महान्यूज लाईव्ह
आज पंतप्रधान मोदी संत तुकाराम महाराजांच्या देहू गावात येत आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज मुर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. मात्र या कार्यक्रमावेळी नरेंद्र मोदींना जी पगडी भेट म्हणून देण्यात येणार आहे. त्या पगडीवरील ओवीमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती आता पुढे येत आहे.
पहिल्यांदा या पगडीवर ‘ भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी ‘ ही ओवी लिहण्यात आली होती. आता मात्र या पगडीवरील ओवी बदलण्यात आली असून आता त्यावर ‘ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ‘ ही ओवी लिहिण्यात आली आहे.
ही पगडी आण उपरणे पुण्यातील मुरुमकर झेंडेवाले यांनी तयार केली आहे. आता ही पगडी आज पंतप्रधान मोदींना भेट देण्यात येणार आहे.
या पगडीवरील ओवी का बदलण्यात आली याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र संत तुकारामांनी त्यांच्या अनेक ओव्यातून समाजातील दांभिकतेवर कोरडे ओढले होते. ‘ नाठाळाच्या माथी हाणू काठी ‘ ही त्यातलीच एक ओवी होती. तुकाराम महाराजांच्या अशा अनेक ओव्या अजूनही लोकांच्या पचनी पडत नाहीत. आजही या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो अनुभव पुन्हा येतो आहे.