मुंबई : महान्यूज लाईव्ह
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी ही भारतातील एक बडी कंपनी. या कंपनीचा आयपीओ येणार याची चर्चा जवळपास गेली वर्षभर सुरु आहे. हा आयपीओ शेअरबाजारात मोठा चमत्कार घडवून आणेल असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटत होता. प्रत्यक्षात हा आयपीओ बाजारात आला, त्यावेळी त्याने खरोखरच चमत्कार वाटावा इतकी खराब कामगिरी केली.
गुंतवणूकदारांचे पैसे बुडवण्यामध्ये हा आयपीओ आशियात नंबर वन ठरला आहे. या आयपीओच्या बाजारमुल्यात १७ बिलियन इतक्या मोठ्या रकमेची घसरण झाली आहे. आयपीओच्या किंमतीपेक्षा एलआयसीचा शेअर २९ टक्क्यांनी घसरला.
आयपीओच्या या घसरणीबाबत एलआयसी आशियात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण कोरियाच्या एलजी एनर्जी सोल्यूशन्सचा स्टॉक ३० टक्क्याने कमी झाला असून या कंपनीचे या घसरणीबाबत पहिला क्रमांक मिळवला आहे. काल एलआयसीचा शेअर ६६८ रुपयावर बंद झाला. म्हणजेच आयपीओच्या मूळ किंमतीपेक्षा २८१ रुपयांनी कमी किंमत या शेअरला मिळाली आहे.
एलआयसीच्या या आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्या अॅंकर गुंतवणूकदारांना लॉक इन कालावधी काल ( ता. १३ ) संपला. त्यानंतर अॅंकर गुंतवणुकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. त्यामुळे एलआयसीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून येते आहे.
आयपीओत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना १.६४ लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एलआयसीसारख्या बड्या कंपनीचा शेअर इतका कसा घसरला याबाबत गुंतवणूक तज्ञांमध्ये सध्या चर्चा सुरु आहे.