शिरुर : महान्यूज लाईव्ह
पंजाबमधील सुप्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याचा खून झाल्यानंतर संतोष जाधवचे नाव त्याचा शूटर म्हणून पुढे आले होते. संतोष जाधव हा मुळचा खेड तालुक्यात असून येथेही राण्या बाणखेले खून प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत होते. या संतोष जाधवला गुजरात राज्यातून ताब्यात घेण्यात आता पुणे ग्रामीण पोलिसांनी यश मिळविले आहे.
मुसेवाला या हत्येनंतर त्याच्या हत्येशी संबंधित महाराष्ट्र कनेक्शनही उघड झाले होते. सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव यांची नावे सुरुवातीला पुढे आली. त्यातील सौरभ महाकाळ याला पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर नवनाथ सूर्यवंशीचेही नाव पुढे आले. त्यालाही पोलीसांनी अटक केली. मात्र संतोष जाधव मात्र पोलीसांना चकवा देत होता.
मात्र सूर्यवंशी सापडल्यानंतर संतोषचा माग पोलीसांना मिळाला. संतोष गुजरातला त्याचा साथीदार नवनाथ सुर्यवंशी याच्याकडे जाऊन लपला होता. पुणे ग्रामीण पोलीस गुजरातमधील भुज तालुक्यातील मांडवी गावात पोचले. तिथे त्यांनी नवनाथ सूर्यवंशीला अटक केली. पोलीसी कौशल्यानंतर नवनाथने संतोष जाधव मांडवी गावाजवळील नागोर गावात लपला असल्याचे सांगितले. तिथे त्याला वेगळी खोली घेऊन दिली गेली होती. ओळख लपविण्यासाठी त्याने टक्कल केले होते. पेहेरावदेखील बदलला होता. मात्र पोलीसांनी तो रहात असलेल्या खोलीवर छापा टाकून त्याला पकडले.
नवनाथ सूर्यवंशी व संतोष जाधव दोघांनाही रविवारी रात्री बारा वाजता शिवाजीनगर मोक्का न्यायालयात न्यायाधिशांच्या घरी नेऊन हजर केले गेले. त्यांना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष जाधव या महाराष्ट्रातील बिश्नोई टोळीचा म्होरक्या होता. त्याच्या माध्यमातून अनेक तरुण या टोळीत सहभागी झाले होते. त्यामुळे आता त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. याचबरोबर सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात त्याचा सहभाग काय होता, याचाही तपास केला जाणार आहे.
राण्या बाणखेले याचा खून झाल्यानंतर दीड वर्षे संतोष जाधव पुणे ग्रामीण पोलिसांना गुंगारा देत होता. आता मात्र त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांनी यश मिळविले आहे.