मुंबई : महान्यूज लाईव्ह
जग खरोखरच बदलत चालले आहे. आता मुल जन्माला येण्यासाठी स्त्रीपुरुष एकत्र येण्याची गरज नाही. फक्त पुरुषाचे वीर्य उपलब्ध असले तरी मुलाचा जन्म होऊ शकतो. आणि अशा प्रकारे मुल जन्माला घालण्याचा ट्रेंड कुठेतरी परदेशात सुरु असेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची मोठी फसगत होते आहे. ज्या राज्याला तुम्ही मागासलेले समजता त्या बिहारमध्ये वीर्य किंवा स्पर्म संरक्षित करून ठेवणाऱ्या बॅंका मोठा व्यवसाय करत आहेत.
परदेशी जाणारे तरुण किंवा वर्षानुवर्षे घरापासून लांब असणारे सैनिक हे या बॅंकांचे सर्वात मोठे ग्राहक आहेत. ते परदेशी किंवा सैन्यात ड्युटीवर जाण्यापूर्वी आपले स्पर्म या बॅंकेत संरक्षित करून ठेवतात. त्यांची पत्नी ठरलेल्या फॅमिली प्लॅनिंगच्या नियोजनानूसार या बॅंकेत येते. शास्त्रोक्त पद्धतीने ते वीर्य धारण करते. मग पुढची नैसर्गिक प्रक्रिया होऊन ती आई होते आणि दूरदेशी असणारा तिचा पती बाप होतो. पाच वर्षासाठी परदेशात गेलेल्या पतीला परत आल्यानंतर आपले तीन वर्षाचे मुल घरात खेळताना दिसू शकते.
बिहारमध्ये तब्बल पाच हजार तरुणांनी आपले स्पर्म अशा प्रकारे संरक्षित करून ठेवलेले आहे. केवळ तरुणच नाही तर महिलाही आता आपले बीजांड म्हणजे एग संरक्षित करुन ठेवत आहे. अर्थात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या १० टक्केच आहे.
पण याच बिहारमधील आणखी एक निरीक्षण मोठे मजेदार आहे. ज्यावेळी पतीचे स्पर्म मुल होण्यासाठी अक्षम असतात, त्यावेळी दुसऱ्या पुरुषाचे स्पर्म वापरले जातात. सगळ्या दुनियेत ज्यावेळी असे दुसऱ्या पुरुषाचे स्पर्म वापरले जातात, त्यावेळी त्या पुरुषाची शारिरिक स्थिती, त्याला काही आजार आहे का, त्याची कौंटुबिक पार्श्वभूमी काय याची विचारणा होते. पण बिहारमध्ये अशा केसमध्ये पहिला प्रश्न त्या पुरुषाची जात काय, असा विचारला जातो. तो पुरुषही आपल्या जातीतील असावा असा आग्रह असतो.
कितीही आधुनिकता आली तरी जात काही जात नाही.