पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील भवानी पेठेतील विशाल सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये मोठा स्फोट झाला आहे. सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये झालेल्या या स्फोटात फ्लॅटच्या खिडक्यादेखील फुटल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिस बॉम्ब शोधक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रशाद मोहम्मद अली शेख या फ्लॅट धारकास ताब्यात घेतले आहे.
या फ्लॅटमध्ये झालेला स्फोट नक्की वॉशिंग मशीनचाच होता का, याबाबत पोलिसांना शंका आहे. या स्फोटात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतू शेख याच्याकडे अनेक सीमकार्ड आणि पासपोर्ट आढळले आहे. तो या पासपोर्टचा वापर करून अनेक देशात गेला असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आहे.
भवानीपेठेजवळील रेल्वे स्टेशनवर काही दिवसांपूर्वीच एक ब्लास्ट झाला होता. हा फ्लॅट संपूर्णपणे रिकामा आहे. संशयित शेख गेल्या दहा वर्षापासून या सोसायटीत राहत असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन मुस्ताक अहमद यांनी दिली.
रशाद शेख हा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असून तो मूळचा मुंबईचा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेमुळे सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.