मुंबई : महान्यूज लाईव्ह
सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर त्यात बिश्नोई गॅंगचे नाव पुढे आले. यामध्ये या बिश्नोई गॅंगने प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला मारण्याचा प्लॅन बनविल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
लॉरेन्स बिश्नोईची २०२१ मध्ये एजन्सीकडून चौकशी झाली होती, त्यावेळी त्याने ही कबुली दिली होती. सलमान खानला मारण्याची जबाबदारी राजस्थानचा गॅंगस्टर संपत नेहरा याच्याकडे सोपविण्यात आली होती. संपत नेहरा मुंबईला गेला आणि त्याने सलमान खान राहत असलेल्या बंगल्याची पाहणीही केली. पण त्यावेळी संपतकडे जी पिस्तुले होती त्यांची रेंज बंगल्याच्या आत असणाऱ्या सलमान खानपर्यंत पोचणारी नव्हती.
त्यानंतर संपत नेहराने आपल्या गावातील दिनेश फौजीच्या माध्यमातून आरके स्प्रिंग रायफल मागवली. ही रायफल लॉरेन्स बिश्नोईने अनील पांड्याकडून ३ ते ४ लाख रुपयात खरेदी केली होती. ही रायफल दिनेश फौजीकडे ठेवली होती. ती रायफल पोलीसांना सापडली आणि संपत नेहराला अटक झाली. त्यामुळे सलमान खान याच्यावरील हल्ल्याचा कट उधळला गेला.
मात्र सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर सलमान खान यांचे वडिल सलीम खान यांना धमकीची चिठ्ठी मिळाली होती. त्यामध्ये तुमचा सिद्धू मूसेवाला करू अशी धमकी देण्यात आली होती. ही चिठ्ठी बिश्नोई गॅंगनेच पाठविल्याचे आता उघड होत आहे.
स्पेशल सीपी एचजीएस धारीवाल यांनी ही माहिती दिली आहे. धारीवाल सध्या सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाची चौकशी करत आहेत.