नगर : महान्यूज लाईव्ह
नगर जिल्ह्यातील कर्जत शहरात राहणाऱ्या 19 वर्षीय युवकाचा किरकोळ कारणावरून त्याच्या घरात कुटुंबीयांशी वाद झाला. या वादातून राग अनावर झाला की, या मुलाने घर सोडले आणि मजल दरमजल करत त्याने थेट मध्यप्रदेश गाठले. तेव्हा हतबल झालेल्या कुटुंबीयांनी कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गळ घातली आणि चंद्रशेखर यादव यांच्या बहादूर पथकाने या मुलांना थेट मध्यप्रदेशातून घरी सुखरूप आणले.
कर्जत मधील ही घटना दोन दिवसापासून अनेकांना मोठी दिलासा देणारे ठरली आहे. गेल्या एक-दीड वर्षापासून कर्जत तालुक्यातील खासगी सावकारकीला आणि अनिर्बंधपणे गावात दहशत माजवणाऱ्यांना लगाम घातल्यानंतर आता कर्जतचे नागरिक त्यांच्या समस्यांसाठी कर्जतचे पोलीस ठाणे गाठू लागले आहेत.
कर्जत येथील 19 वर्षीय युवकाने रागाच्या भरात राहते घर सोडले आणि तो घरातून निघून गेला. या घटनेने कुटुंबीय घाबरून गेले. कुटुंबीयांनी मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. तेव्हा मात्र पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घाबरू नका असा सल्ला देत आपली यंत्रणा कामाला लावली. तांत्रिक तपास तसेच माहितगारांच्या वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत हा मुलगा मध्य प्रदेशमधील इंदूर परिसरात पिथमपूर येथे असल्याची माहिती मिळाली.
यादव यांनी या ठिकाणी तात्काळ पोलीस पथक रवाना केले आणि या मुलाला शोधण्यास सुरुवात केली. मात्र हा मुलगा मोबाईल बंद करून बसल्याने नेमका तो कोठे आहे हे माहिती होत नव्हते. त्यामुळे कर्जत पोलिसांनी संपूर्ण शहरात फिरून छायाचित्रे दाखवण्यास सुरुवात केली. या तपासात काही काळानंतर एका ठिकाणी तो थांबल्याचे निदर्शनास आले.
तपास पथकाने या मुलाला ताब्यात घेतले आणि कर्जतला आणून त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले, तेव्हा मात्र या मुलाच्या कुटुंबियांच्या भावना अनावर झाल्या होत्या. त्यांना चंद्रशेखर यादव या नेत्यांच्या पथकाचे आभार कसे मानावेत हेच समजत नव्हते. हा संपूर्ण तपास नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस नाईक संभाजी वाबळे, अर्जुन पोकळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला.