मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेच्या झालेल्या पराभवाच्या बातम्या ज्या दिवशी आल्या त्याच दिवशी मार्च महिन्यात घडलेल्या किंवा न घडलेल्या एका घटनेची बातमी माध्यमात झळकू लागली. हा निव्वळ योगायोग म्हणता येईल का ?
ही दुसरी बातमी नवाब मलिकांबाबत होती. नवाब मलिकांनी कारागृहाचे नियम पाळण्यास नकार दिला, अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घातली, अधिकाऱ्यांना दमदाटी केली, नियमानूसार तपासणीस नकार दिला अशा पद्धतीची ही बातमी होती. ज्यावेळी नवाब मलिकांना कारागृहात पाठविण्यात आले, त्यावेळी म्हणजे मार्च महिन्यात हा प्रकार घडल्याचे बातमीवरून दिसते.
कारागृहात प्रवेश करतेवेळी प्रत्येक कैद्याची एका स्वतंत्र खोलीत अंगावरचे सर्व कपडे काढून तपासणी केली जाते. कारागृहाच्या निमयानूसार नवाब मलिकांनाही त्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले. त्यावेळी त्यांनी नकार दिला. मंत्री असल्याचा रुबाब दाखवला, अशा बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत.
खरेतर नवाब मलिक मार्च महिन्यापासून तुरुंगात आहेत. म्हणजे जर असे काही घडलेच असेल, तर ते मार्च महिन्यात घडले असेल. आता तीन महिन्यानंतर नेमकी राज्यसभा निवडणूकांच्या बातम्या येण्याच्या दिवशी ही बातमी माध्यमांमध्ये येण्याचे कारण काय? हा खरा प्रश्न आहे.
कारागृह अधिकाऱ्यांनी मात्र या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे, तसेच असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.
शिवसेनेचा पराभव आणि नवाब मलिकांचे ‘ विवस्त्र तपासणी ‘ यामध्ये लिंक जोडण्याचा हा प्रयत्न असावा असे मानले जात आहे. माध्यमांतील एक वर्गच हेतूपुर्वक अशा एकांगी बातम्या पसरवतो, हे अनेक वेळा दिसून आले आहे. राज्यसभेच्या निकालादिवशीच आलेल्या नवाब मलिकांबाबतच्या बातम्या हादेखील यातीलच एक प्रकार आहे.