मुंबई : महान्यूज लाईव्ह
काल मध्यरात्रीनंतर राज्यसभेचा निकाल हाती आला. निवडणूकीपुर्वी बरेच दिवस बातम्यांमध्ये ही निवडणूकचे होती. आता निवडणूकीनंतर आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले असून अजून काही दिवस ही निवडणूक वाचक आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करेल असे दिसते आहे.
या निवडणूकीत प्रतिष्ठेची ठरलेली सहाव्या जागेची निवडणूक भाजपाने जिंकली. निवडणूक मॅनेजमेंट कौशल्यात देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीला भारी ठरले. त्यानंतर आता शिवसेनेचे नवनियुक्त खासदार संजय राऊत यांनी थेट महाविकास आघाडीला मते न दिलेल्या आमदारांची नावेच जाहीर करून टाकली आहेत.
करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभीमानीचे आमदार देवेंद्र भुयार आणि बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार यांनी आम्हाला मते दिली नाही असे शिवसेनेचे नवनियुक्त खासदार संजय राऊत यांनी थेट सांगितले होते.
आम्हाला मित्रपक्षांनी दगा दिला नाही. जे घोडेबाजारात उभे होते, त्यांची सहा सात मते आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही आणि कुठला व्यापारही केला नाही, असे म्हणत त्यांनी या आमदारांवर ठपकाही ठेवला आहे. या आमदारांनी शब्द देऊन दगाबाजी केली असेही राऊत म्हणाले आहेत.
खास संजय राऊत शैलीत ‘ घोडेबाजारातील घोड्यांमुळे सरकारला फरक पडणार नाही. फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, हरभरे अपक्षांनी खाल्ले आहेत, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
या निवडणूकीत शिवसेनेचे संजय राऊत निवडून आले असले तरी त्यांचे दुसरे उमेदवार संजय पवार मात्र पडले आहेत. संजय पवारांचा हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसते आहे.