किशोर भोईटे,
सणसर महान्यूज लाईव्ह
सध्या शेतकऱ्याला ऊसशेती खर्चाच्या तुलनेत म्हणावी तशी परवडत नाही मात्र आहे त्या खर्चात जास्त उत्पादन घेतले तर शेतकऱ्याला ऊस पिकातून अर्थप्राप्ती होऊ शकेल. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जमीन मशागत व बियाणे निवडीपासून उसाची तोड होईपर्यंत योग्य नियोजन केल्यास एकरी १०० टन ऊस उत्पादन शक्य आहे अशी माहिती सणसर चे मंडळ कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे यांनी शेती शाळेत दिली.सणसर येथे कृषी विभाग इंदापूर यांच्या वतीने बजरंग रायते यांचे शेतावर क्रॉपसॅप संलग्न एकरी १०० टन ऊस उत्पादन अभियान कार्यशाळा पार पडली.
उसाची लागण करताना चांगल्या प्रतीचे बियाणे वापरावे, सुपर केन नर्सरी चा वापर करावा, उसाची लागण पाच बाय दोन या अंतरावर करावी, एका उसाला एक स्क्वेअर फूट जागा मिळाली तर अडीच किलोपर्यंत एका उसाचे वजन भरते, बियाण्याला कीटकनाशक, बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून खोडकीडीचे निर्मूलन करता येते. त्याचबरोबर चुन्याची निवळी पाच किलो २० लिटर पाण्यात बियाणे बुडवावे, जिवाणू प्रक्रिया करावी त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्याचे विघटन होऊन ते पिकास उपलब्ध होते.
सध्या हुमणीचे भुंगे मोठ्या प्रमाणात दिसत असून रात्री प्रकाश सापळ्यांचा वापर करून शेतकऱ्यांनी हुमणीचे भुंगे नष्ट करावेत. त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव कमी होईल. यामुळे भविष्यात हुमणीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ऊस उत्पादन आपोआप वाढणार नाही असे वाघमोडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी छत्रपती कारखान्याचे संचालक डॉ. दीपक निंबाळकर ,राज्य डाळिंब बागायतदार संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक, सणसर विकास सोसायटीचे अध्यक्ष परशुराम रायते, पोलीस पाटील राजेंद्र चव्हाण, कृषी पर्यवेक्षक सचीन चितारे, कृषी सहाय्यक मार्तंड देवडे यांनीही मार्गदर्शन केले.कृषी पर्यवेक्षक राजू घुले ,कृषी सहाय्यक शिवराज मसाले, ओंकार काळे, मार्तंड वाघमोडे, कांबळे, धापटे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.