राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरवंड येथील गाडी खरेदी विक्री करणाऱ्या आणि बेपत्ता असलेल्या राजेंद्र म्हस्के याचा मागील काही दिवसांपुर्वी अल्पवयीन मुलाने मित्राच्या मदतीने निघृण हत्या केल्याची घटना घडली होती. याच प्रकरणात फिर्यादी आणि राजेंद्र म्हस्के यांची पत्नी गौरी हिचाही सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी ही माहिती दिली.
केडगाव – चौफुला येथे गाडी खरेदी विक्री करणाऱ्या आणि बेपत्ता असलेल्या वरवंड येथील राजेंद्र दत्तात्रय म्हस्के यांची ( दि. २७ ) रोजी अल्पवयीन मुलाने वडील दारू पिवून आईच्या डोक्यात दारुची बाटली घातली आणि मला शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने याचा राग धरुन मुलगा वृषभ ने वरवंडचे माजी सरपंच यांच्या मुलगा मित्र स्वास्तीक संजय खडके यांच्या मदतीने घरामधील लोखंडी हातोडी डोक्यात मारुन आणि उशी तोंडावर दाबुन निघृण हत्या करून मृतदेह येडशी ( ता.जि.उस्मानाबाद ) येथील जंगलात फेकून दिल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीसांनी मुलगा वृषभ राजेंद्र म्हस्के, स्वस्तीक संजय खडके यास अटक केली होती. याप्रकरणात आई गौरी हिचा सहभाग असल्याचा संशय पोलीसांना होता. त्यादृष्टीने सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी सखोल चौकशी केली असता पत्नी गौरी हिने खुन केल्याचे माहिती असुनही माहिती लपविली, तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींना मदत केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच स्वातिक याचा मित्र प्रथमेश पंडीत यानेही खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलगा वृषभ आणि त्याचा मित्र स्वातिक यास पोलीसांनी यापुर्वी अटक केली होती. आता गौरी राजेंद्र म्हस्के ( वय ४० ) , प्रथमेश पंडीत ( वय २०, दोघेही राहणार वरवंड ) या दोघांना पोलिसांनी अटक केले आहे.
या प्रकरणात एकुण चार आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वाबळे यांनी दिली. दरम्यान, गौरी हिने आपले पती राजेंद्र म्हस्के हे बेपत्ता झाल्याची खबर यवत पोलीस स्टेशन आणि पाटस पोलीस चौकीला दिली होती. तर माझे वडील बेपत्ता झाले आहेत त्यांचा शोध का लागत नाही अशी वारंवार विचारणा आरोपी मुलगा वृषभ हा करीत होता. मात्र पोलीसांनी तपास करीत असताना आई आणि मुलगा यांच्या बोलण्यात विसंगती आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांना हे प्रकरण संशयास्पद वाटु लागल्याने त्यांनी या प्रकरणाची सखोल मध्ये जाऊन चौकशी केली असता ते बेपत्ता झाले नाही तर त्यांचा खून झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध व चलाखीने खुन करून, मृतदेह जिल्ह्याबाहेरील जंगलात टाकून खुन केल्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी या खुनाचा उलगडा करुन चार आरोपींना जेरबंद केले.
या कामगिरीबद्दल यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे आणि पोलीस टिमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून ग्रामस्थांनीही अभिनंदन केले आहे.